PSI Somnath Zende : एका रात्रीत करोडपती झालेला पीएसआय निलंबित; काय आहे नेमकं कारण? | पुढारी

PSI Somnath Zende : एका रात्रीत करोडपती झालेला पीएसआय निलंबित; काय आहे नेमकं कारण?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील फौजदार ड्रीम्स इलेव्हनमुळे करोडपती झाला. दरम्यान, पोलिस अधिकारी कर्तव्यावर असताना जुगार सदृश्य गेम कसे खेळू शकतात, असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार, चौकशीअंती संबंधित फौजदारास निलंबित करण्यात आले आहे.

सोमनाथ झेंडे असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. सोमनाथ झेंडे हे सध्या आरसीपी (दंगा काबू पथक) पथकात कार्यरत होते. १० ऑक्टोबर रोजी उर्से टोल नका येथे बंदोबस्तात असताना त्यांना ड्रीम ११ या ऑनलाईन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागल्याचे समजले. ही बातमी वेगाने सर्वत्र पसरली. अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मात्र, कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी कसा काय ऑनलाईन गेम खेळू शकतो, ड्रीम्स ११ हा एका प्रकारचा जुगार आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करीत काहींनी झेंडे यांच्यावर टीका केली आहे. तर, काहींनी नशीबवान आहे हा अधिकारी, अशा प्रतिक्रिया देत त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती मंगळवारी (दि. १७) झेंडे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

दुसऱ्यांदा निलंबन

उपनिरीक्षक झेंडे हे पूर्वी चाकण पोलिस ठाणे नेमणुकीस होते. दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एक गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी लाचलुचपत विभागाने झेंडे यांच्यासाठी एका खासगी इसमाला पैसे घेताना रंगेहात पकडले. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केले होते.

भाजपने केली होती कारवाईची मागणी…

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्तीस असलेले पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळतात. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती भाजपचे पदाधिकारी अमोल थोरात यांनी केली होती.

हेही वाचा

Nashik News : आयटी पार्कसाठी राजूर बहूलात शंभर एकर जागा आरक्षित

रस्ता करीत असताना सापडली दोनशे वर्षांपूर्वीची लाकडी नौका

Back to top button