रस्ता करीत असताना सापडली दोनशे वर्षांपूर्वीची लाकडी नौका | पुढारी

रस्ता करीत असताना सापडली दोनशे वर्षांपूर्वीची लाकडी नौका

वॉशिंग्टन : काही वेळा उत्खननावेळी चक्क लाकडी नौकांचेही अवशेष सापडत असतात. यापूर्वी एस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे बांधकामासाठी करण्यात आलेल्या उत्खननावेळी 700 वर्षांच्या जहाजाचे अवशेष सापडले होते. आता अमेरिकेत फ्लोरिडामध्येही असाच प्रकार घडला आहे. येथे रस्त्याचे काम चालू असताना अचानक रस्त्याखाली सुमारे 200 वर्षे जुनी वस्तू आढळून आली. पण ही काही छोटी वस्तू नसून ती एक लाकडी नौका आहे जी रस्त्याखाली गाडली गेली होती.

पुरातत्त्व शास्त्रज्ञांना फ्लोरिडामध्ये जमिनीखाली गाडलेली 19 व्या शतकातील बोट सापडली आहे. फ्लोरिडा परिवहन विभागाने याबाबत माहिती दिली आहे. साऊथईस्टर्न आर्कियोलॉजिकल रिसर्चच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी सांगितले की ही बोट 19 व्या शतकातील असेल. राज्य परिवहन अधिकार्‍यांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंवरून बोटीची रचना अजूनही सुरक्षित असल्याचे दिसून येते. अभियंते रस्ता बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. हा एक ड्रेनेज सुधारणा प्रकल्प होता जो किंग स्ट्रीट आणि स्टेट रोड वर चालू होता. हे ठिकाण लियॉन्सच्या पुलाजवळ आहे.

ड्रेनेज सुधारल्यानंतर रस्ता तयार केला जात असताना कामगारांना जमिनीखाली लाकडाचे तुकडे आढळून आले. त्यांनी आत खोदले असता त्यांना बोटीच्या आकाराची वस्तू दिसून आली. ही बोट 200 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही लाकडी बोट सुमारे 20 फूट लांब आहे. ही बोट मासेमारीसाठी वापरली जात असावी किंवा सामान्य व्यापारातही वापरली गेली असावी, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. या ठिकाणाहून जुने लेदर शूज आणि इतर अनेक गोष्टी सापडल्या आहेत. याशिवाय, सिरॅमिकची भांडी आणि लोखंडी तुकडेही सापडले आहेत.

Back to top button