School Students : विद्यार्थ्यांचा स्वतंत्र ‘अपार आयडी’ तयार करा; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्य शासनाला निर्देश | पुढारी

School Students : विद्यार्थ्यांचा स्वतंत्र 'अपार आयडी' तयार करा; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्य शासनाला निर्देश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, प्रत्येक विद्यार्थ्याचा ‘वन नेशन वन स्टुडन्ट आयडी’ असणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांच्या पूर्वपरवानगीने विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करावा, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्य शासनाला देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र ‘अपार आयडी’ तयार करावा लागणार आहे.

येत्या 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत ‘अपार आयडी’ तयार करून घ्यावा, अशा सूचना राज्याचे केंद्रीय सचिव संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी शरद माकणे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आता जागतिक नागरिक म्हणून पाहिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा एक स्वतंत्र युनिक आयडी असणे गरजेचे आहे. त्यात परीक्षेचा निकाल, समग्र अहवाल कार्ड, ऑलंपियाड, विद्यार्थ्याने इतर उपक्रमांत केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण आदी क्षेत्रांत विद्यार्थ्याने मिळवलेले यश आदी विषयांची माहिती असणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने ‘अपार आयडी’ तयार केला जाणार आहे. यातून जमा होणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे,असे केंद्रीय सचिव संजय कुमार यांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील शिक्षक शालाबाह्य कामांमुळे वैतागलेले असताना आता ‘अपार आयडी’ तयार करण्याचे काम सोपवले जाऊ शकते. शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबवावीत या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यात आता जर अपार आयडी तयार करण्याचे काम शिक्षकांवर सोपवले गेले, तर शिक्षक याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

El Nino : यंदाचा अल निनो ठरला सर्वात प्रबळ; 17 राज्यांत अल्प

अर्थशास्‍त्र : बाईपण किती भारी?

Navratri 2023 : मंगलमय नवरात्रौत्सव आजपासून

Back to top button