अर्थशास्‍त्र : बाईपण किती भारी? | पुढारी

अर्थशास्‍त्र : बाईपण किती भारी?

प्रा. विजय ककडे

क्लॉडिया गोल्डीन या विद्यार्थीप्रिय संशोधक, शिक्षिका आहेत. ‘विद्यार्थीच माझ्या ज्ञानकक्षा विस्तारण्यास मदत करतात,’ असे त्या प्रांजळपणे म्हणतात. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही पूर्ण दिवस त्या विद्यार्थ्यांमध्येच रममाण झाल्या होत्या. महिलेला श्रमबाजारात नेहमी दुय्यम स्थानावर रेटत असताना तंत्रप्रगती कशाप्रकारे प्रभाव टाकते, याचे चित्र त्यांच्या सखोल व विस्तृत संशोधनातून स्पष्ट होते.

अर्थशास्त्रातील सर्वोच्च नोबेल सन्मान हार्वर्ड विद्यापीठातील 77 वर्षांच्या संशोधक क्लॉडिया गोल्डीन यांना नुकताच जाहीर झाला आहे. ही एका अर्थाने महिला कामगारांच्या आर्थिक शोषणाच्या इतिहासाला, तसेच महिलांच्या वेतनभिन्नतेच्या विश्लेषणाची घेतली गेलेली योग्य दखल आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दोन शतकांच्या आकडेवारीचा धांडोळा घेत काही वेळा गुप्तहेराप्रमाणे माहितीचे दुवे जोडत स्त्रियांचे आर्थिक योगदान दुय्यमच का राहते? याची मीमांसा क्लॉडिया यांनी संशोधनातून केली. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक प्रगती होते, असा समज नेहमीच खरा असतो, असे नाही याची प्रचिती त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाली. स्त्रिया व पशू हे पुरुषांपेक्षा खालच्या दर्जाचेच असतात, हा फक्त मनुस्मृतीपुरताच नियम नसतो, तर प्रगत अमेरिकेचाही तोच व्यवहार व विचार असल्याचे कटुसत्य या संशोधनातून आकडेवारीसह स्पष्ट केले गेले. महिलेला श्रमबाजारात नेहमी दुय्यम स्थानावर रेटत असताना तंत्रप्रगती कशाप्रकारे प्रभाव टाकते, याचे चित्र त्यांच्या सखोल व विस्तृत संशोधनातून स्पष्ट होते.

संशोधनाचे स्वरूप व महत्त्व

नोबेल पारितोषिक समितीने गोल्डीन यांची निवड करताना स्त्री श्रमशक्तीच्या ज्ञानात महत्त्वाची भर पाडली, असे म्हटले आहे. अर्थशास्त्रात 1969 पासून आतापर्यंत 92 लोकांना हा नोबेल सन्मान मिळाला असून, त्यात 2009 मध्ये ऑस्ट्रॉम व 2019 मध्ये डफ्लो या दोनच महिला होत्या. आता 2023 मध्ये गोल्डीन यांच्या रूपाने तिसर्‍या महिलेचा गौरव झाला आहे. श्रम अर्थशास्त्रात महिलांची रोजगारस्थिती, वेतनभिन्नता, याबाबत त्यांचे मार्गदर्शक फॉजेल यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिला श्रम सहभाग दर, त्यावर परिणाम करणारे घटक यांचे विश्लेषण गोल्डीन यांनी केले. पालकत्व, शिक्षण, आईचा रोजगार अनुभव, तंत्रप्रगती या घटकांनी स्त्रियांचे रोजगार व उत्पन्न प्रभावित होतात. पुरुष-स्त्री यांच्यातील वेतन दरी अद्याप टिकून आहे. त्याचे स्वरूप दोनशे वर्षांत यू आकाराप्रमाणे राहिल्याचे त्यांचे संशोधन स्पष्ट करते.

औद्योगिक क्रांती व स्त्रियांचा रोजगार

औद्योगिक क्रांतीपूर्व उत्पादन लहान प्रमाणावर व कौटुंबिक स्तरावर, कुटिरोद्योग स्वरूपात होते. या व्यवस्थेत स्त्रियांना रोजगार घरीच उपलब्ध असल्याने त्यांच्या सहभाग मोठा होता. परंतु, औद्योगिक क्रांतीने हे चित्र बदलले. कारखाना पद्धती उदयास आली. आता कारखान्यांतून, घरापासून दूर रोजगारासाठी जावे लागत असल्याने महिलांचा श्रम सहभाग 19 व्या शतकात घटला. ही घसरण औद्योगिक क्रांतीने स्त्रियांवर लादली. 20 व्या शतकात सेवा क्षेत्राचा विकास झाला. स्त्रियांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या. यातून आता स्त्रियांचा रोजगार वाढला. अशाप्रकारे औद्योगिक क्रांतीने घटवलेला स्त्री रोजगार व सहभाग वाढला. तरीपण स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन देण्याची पद्धती व मानसिकता तशीच राहिल्याने वेतन दरी मिटलीच नाही. एकूण महिलांपैकी फक्त 20 टक्के महिलांनाच रोजगार संधी मिळते व विवाहित महिलेबाबत हे प्रमाण 5 टक्के इतकेच आहे. आजही पुरुषांपेक्षा 20 टक्के वेतन/उत्पन्न महिलेला कमी मिळते, असा त्यांचा निष्कर्ष आहे.

लग्न, मूल व गर्भनिरोधक गोळी

पालकत्व, लग्न याचा प्रतिकूल परिणाम स्त्रियांना आपल्या रोजगार संधीचा, करिअरचा त्याग करण्यात होतो. स्त्रियांना समान नागरी हक्क, न्याय, वाटा मिळण्यात लग्न व मूल ही मोठी अडथळ्याची बाब ठरते. 1970 च्या दशकात गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्या व त्यातून पालकत्व पुढे ढकलणे शक्य झाले. यातून स्त्रियांना शिक्षणासाठी अधिक वेळ देणे व करिअरसाठी वेळ देणे शक्य झाले. तथापि, रोजगारात येताना तिला घरचा अनुभव, आईचा अनुभव महत्त्वाचा ठरला. करिअर हे आईला जसे अडचणीचे ठरले तसेच तोच वारसा मुलीकडेही हस्तांतरित झाला. हा नकारात्मक वारसा श्रम सहभाग दर घटवण्यास, वेतन फरकास साहाय्यभूत ठरला. श्रमबाजारात भेदात्मक वेतन, रोजगार संधी केवळ स्त्री-पुरुष या स्वरूपात नाही, तर काळे-गोरे, स्थानिक-बाहेरचे, असाही आहे. भेदात्मक वर्तनाची सुरुवात घरापासून मानसिक जडणघडणीत होते. गृहिणी हे पद सांगणारी महिला जरी कामाचा मोठा भार उचलत असली, तरी त्यात सन्मानाऐवजी आपण खालच्या स्तराचे आहोत, हेच व्यक्त केले जाते. समानतेचा संघर्ष अनेक स्तरांवर व दीर्घकाळ स्त्रीवादी चळवळी करीत आहेत. गोल्डीन यांचे योगदान वेतन दरी स्त्री-पुरुष यात कोणत्या कारणाने घडते, वाढते याचे स्पष्टीकरण करते. त्याआधारे धोरणात्मक निर्णय घेणे हे पुढचे पाऊल धोरणकर्त्यांचे ठरते.

भारतीय संदर्भ

जगातील सर्वाधिक मोठ्या आकाराच्या व तरुण लोकसंख्येचा अभिमान मिरवणार्‍या, महासत्तेची स्वप्ने पाहणार्‍या भारतास गोल्डीन यांचे संशोधन अनेक अर्थाने मार्गदर्शक ठरते. स्त्रियांना सत्ता व मत्ता यात वाटा देण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी मुळात रोजगारच घटत असेल, तर त्याचा प्रथम आघात स्त्री रोजगारावरच होतो. स्त्रियांना देवत्व देणारे प्रत्यक्षात समानता नाकारणारे असतात, हा अनुभव अनेक स्तरांवर येत असल्याने अशाप्रकारचे संशोधन ग्रामीण व कृषीकेंद्रित व्यवस्थेत अधिक गुंतागुंतीचे निष्कर्ष देणारे ठरेल. कोरोना कालखंडानंतर एकूण रोजगार प्रमाण आकसलेले असल्याने त्याचे परिणाम स्त्रियांच्या रोजगारावर कसे झाले, याचा सखोल अभ्यास मार्गदर्शक ठरेल. वर्ण व जातीव्यवस्थेची उतरंड समानतेच्या विरोधातच असते. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती, तंत्रबदल होतात, तेव्हा त्याचा भार महिलांवर पडतो. यासाठी सजगपणे महिला सक्षमीकरणाचे धोरण राबवणे आवश्यक ठरते. सध्या महाराष्ट्रात बस प्रवासात महिलांना सवलत असून, त्यांची गतिशीलता वाढली आहे. रोजगार सुविधा त्यामुळे वाढली आहे. असे सकारात्मक बदल स्त्री-पुरुष वेतन उत्पन्न भिन्नता घटण्यास उपयुक्त ठरू शकतात.

क्लॉडिया गोल्डीन या विद्यार्थीप्रिय, संशोधक, शिक्षिका आहेत. विद्यार्थीच मला ज्ञानकक्षा विस्तारण्यास मदत करतात, प्रवृत्त करतात व त्यांच्यामुळेच मी संशोधन करते, असे त्या प्रांजळपणे म्हणतात. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही तो पूर्ण दिवस त्या विद्यार्थ्यांमध्येच रममाण झाल्या होत्या. क्लॉडिया यांचे आचरण सामाजिकशास्त्रातील संशोधकास आदर्शवत ठरेल असे आहे. दोन शतकांचा आधार घेत त्यांनी केलेले संशोधन धोरणात्मक बदलाच्या द़ृष्टीने अनेक सूचना करते. बाईपण किती भारी असते, हेच वेगळ्या अर्थाने दाखवून देते.

Back to top button