Pune News : ताण-तणावाचा मेंदूच्या न्यूरल सर्किटवर परिणाम; उंदरांवर प्रयोग करून काढला निष्कर्ष | पुढारी

Pune News : ताण-तणावाचा मेंदूच्या न्यूरल सर्किटवर परिणाम; उंदरांवर प्रयोग करून काढला निष्कर्ष

आशिष देशमुख

पुणे : आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे बालपणी तुम्ही खूप ताण सहन केला तर सावधान… कारण तुमच्या मेंदूवर (न्यूरल सर्किट) विपरीत परिणाम झालेला असू शकतो, असे संशोधन पुणे शहरातील राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांच्या टीमने नुकतेच केले आहे. उंदरांवर प्रयोग करून शास्त्रज्ञांनी हा शोधनिबंध जगासमोर मांडला आहे. आयसर अर्थात राष्ट्रीय विज्ञान संस्था ही भारत सरकारची देशातील आघाडीची विज्ञान संशोधन संस्था आहे. येथे विज्ञानातील विविध विषयांवर सतत संशोधन सुरू असते.

याच संस्थेतील डॉ. अब्राहम निक्सॉन यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाक्षी पारदासानी, अनंता महर्षी रामकृष्णन, सारंग महाजन, मेहेर कांटू या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांचा हा शोधनिबंध नेचर प्रकाशन समूहाच्या ‘मॉलिक्युलर सायकॅस्ट्री’ या विज्ञान शोधपत्रिकेत 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाला. यात त्यांनी बालपणातील ताणतणावाचा मनुष्य मोठा झाल्यावर त्याच्या मेंदूच्या स्वाथ्यावर कसा परिणाम होतो यावर सखोल संशोधन सादर केले आहे. नवजात उंदरांवर हा प्रयोग करून त्यांनी हा निष्कर्ष जगासमोर मांडला आहे.

या संशोधनानुसार सुरुवातीच्या जीवनातील प्रतिकूलता मेंंदूतील न्यूरल सर्किट्स बदलते. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक पातळीवर काही परिणाम होऊ शकतात. असे नकारात्मक परिणाम एखाद्या व्यक्तीच्या भावनिक, संवेदनात्मक आणि संज्ञानात्मक क्षमतेसाठी आव्हाने निर्माण करतात. तुमचे बालपण जर सातत्याने तणावपूर्ण वातावरणात गेले असेल तर त्या अनुभवांचा इतिहास मेजर डिप्रेशन डिसऑर्डर (एमडीडी) संवेदना आणि संज्ञानात्मक कमतरतांशी संबंधित आहेत. मेंदूचे क्षेत्र जे एन्कोडिंग संवेदना आणि मूल्यांकन करण्यास सक्षम असते. ते थेट प्राणी मॉडेलमध्ये वापरले जाऊ शकते. प्रारंभिक जीवनातील तणावाचा विशिष्ट प्रभाव तपासणे शक्य आहे, जे ग्रहणक्षम निर्णय घेण्यावर नियंत्रण ठेवू शकतात अशा अवयवांवरील विपरीत परिणामांचा अभ्यास शक्य आहे.

माऊस मॉडेलने केला अभ्यास

जन्मानंतरचे तणाव मोजण्यासाठी या शास्त्रज्ञांनी माऊस मॉडेल्सचा आधार घेतला. नवजात उंदरांवर प्रयोग केला असता ते नकारात्मकरीत्या प्रभावित झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या घाणेंद्रियांवर सुमारे 20 टक्के विपरीत प्रभाव झालेला दिसला. त्यांचे कार्य बिघडलेले दिसून आले. तणावामुळे मेंदूत उदासीन फिनोटाईप तयार होतात. न्यूरॉन्स मॉर्फोलॉजिकल, इलेक्ट्रोफिजियोलॉजिकल आणि फंक्शनल मॅच्युरेशन या शास्त्रीय संज्ञांनुसार जन्मानंतरचे जीवन हा एक गंभीर कालावधी आहे. त्या काळात जे ताणतणाव बालक सोसतो त्याचा परिणाम पुढील जीवनावर होतो. त्या वेळी न्यूरोसायकियाट्रिक विकारांचे मूल्यांकन करणे गरजेचे असते, असा निष्कर्ष या शोधनिबंधात काढला आहे.

हे संशोधन आम्ही पुण्यातील आयसर संस्थेत केले. यात अनेक वैज्ञानिक शास्त्रीय मॉडेल्स वापरली. नवजात उंदरांवर प्रयोग करून त्यांच्या मेंदूतील न्यूरल सर्किटमधील झालेले बदल आम्ही टिपले. ओफ्लॅक्सोमीटर हे यंत्र विकसित केले त्याद्वारे गंध ओळखण्याची क्षमता उंदरांनी किती गमावली ते मोजता आले.

– डॉ. अब्राहम निक्सॉन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसर, पुणे

हेही वाचा

laser Beam : लेझर बीमविरोधात जनहित याचिका; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमार्फत याचिका दाखल

मराठा वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर जागा घेणार : चंद्रकांत पाटील

पुणे जिल्ह्यात 4 हजार विहिरींचे पुनर्भरण

Back to top button