

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत असून, जिल्ह्यातील 4 हजार 274 विहिरी पुनर्भरणासाठी पात्र आहेत. या विहिरीमध्ये भविष्यात पडलेला पाऊस जमा होणार आहे. जिल्ह्यात एकूण 60 हजार विहिरी असून, त्यापैकी उतारावर असलेल्या 4 हजार 274 विहिरी पुनर्भरणासाठी पात्र करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनासोबत वन, कृषी विभागाकडून पुनर्भरणासाठी आवश्यक ठिकाणे सुचवून आली आहेत. विहिरींच्या परिसरात ओढा, नाला, उतारावर असलेल्या विहिरी पात्र करण्यात आल्या असून कामे झालेल्या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर हे पाणी थेट विहिरींमध्ये जमा होणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने ही कामे सुरू करण्यात आली आहेत. पुरंदर, शिरूर आणि जुन्नर या तालुक्यांत सर्वाधिक विहिरींची कामे झाली आहेत.
पावसाची अनियमितता आणि त्यातील खंड यामुळे काही तालुक्यात पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची मोहीम कृषी व अन्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्र, लोकप्रतिनिधी सहभागी होत आहेत. त्यातून जिल्ह्यात 10 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट आहे.
हेही वाचा