चांगली बातमी ! लाल परीची तूट 80 कोटींनी कमी ! | पुढारी

चांगली बातमी ! लाल परीची तूट 80 कोटींनी कमी !

जळोची : पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य प्रवाशांचा आधार असलेली लालपरी शासकीय योजनांमुळे आर्थिक अडचणीतून बाहेर येत आहे. सरकारकडून दरमहा लाल परीला 325 कोटी रुपये मिळत आहेत. दररोज सरासरी 55 लाख प्रवासी एसटीतून प्रवास करतात. त्यातून दरमहा 850 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आहे. महामंडळाची वार्षिक तूट 550 कोटींवरून आता 470 कोटींवर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या 15 हजार 600 बसगाड्या आहेत. सरकारने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. दुसरीकडे 75 वर्षांवरील व्यक्तीला मोफत प्रवास, 60 ते 74 वर्षांच्या ज्येष्ठाला 50 टक्के सवलत, महाविद्यालयीन मुलींना मोफत प्रवास अशा सुविधा दिल्या आहेत. त्यातून महामंडळाला राज्य सरकारकडून दरमहा 325 कोटी रुपये मिळतात. पूर्वी 200 कोटींपर्यंतच मिळत होते. सरकारच्या योजनांमुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. महामंडळाची आर्थिक घडी बसविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.

पाच हजार ई-बस
सध्या लाल परीच्या ताफ्यात ई-शिवाई दाखल झाली आहे. पुणे-नगर, सोलापूर-पुणे अशा वेगवेगळ्या मार्गांवर सध्या 50 ई-शिवाई बस धावत आहेत. आगामी दोन वर्षांत तब्बल 5 हजार इलेक्ट्रिक बस राज्य परिवहनच्या ताफ्यात येणार आहेत. त्यामुळे इंधनावरील मोठा भार कमी होऊन लाल परीची तूट आणखी 200 कोटींनी कमी होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाची सद्य:स्थिती
प एकूण बसगाड्या 15,600 प दरमहा सरासरी प्रवाशी 55 लाख प महिन्याचे उत्पन्न 850 कोटी प मासिक सरासरी तूट 40 कोटी

विविध योजनांमुळेही सरकारकडून दरमहा महामंडळाला सरासरी 325 कोटी रुपये मिळतात. आता महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसगाड्या येणार आहेत. त्यामुळे ही तूट आणखी कमी होईल.
                             – शेखर चन्ने, उपाध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळ

हेही वाचा :

Back to top button