पोलिसांना पाहून पळाले अन् जाळ्यात अडकले | पुढारी

पोलिसांना पाहून पळाले अन् जाळ्यात अडकले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे डेबिट कार्ड हातचलाखीने काढून घेत वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून आर्थिक फसवणूक करणार्‍या आंतरराज्य टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. मयंककुमार संतराम सोनकर (27, रा. द्वारका संकुल अपार्टमेंट, धानोरी, मूळ रा. हमीपूर, उत्तर प्रदेश), कपिल राजाराम वर्मा (30, रा. परांडेनगर, धानोरी, मूळ रा. बडनी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एटीएमकार्डद्वारे खरेदी केलेले सोने, दुचाकी, रोकड आणि विविध बँकेची तब्बल 62 एटीएम कार्ड जप्त करण्यात आली.

फिर्यादी हे 22 सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी चौकातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपींनी हातचलाखीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले बँकेचे डेबिट कार्ड चोरले. यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून या कार्डच्या साहाय्याने पैसे काढले, पोलिस अंमलदार प्रफुल्ल मोरे आणि शेखर खराडे यांना एटीएम कार्डची हेराफेरी करून फसवणूक करणारे आरोपी कस्तुरबा हाऊसिंग सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएमजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लाल रंगाच्या दुचाकीवर (एमएच 12 ईझेड 3386) आलेल्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.

मात्र, त्यांनी न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या अंगझडतीत सोनकरकडे 4 हजार 500 रुपये रोख आणि वेगवेगळ्या बँकेची 16 डेबिट कार्ड तसेच दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या पत्नीचे डेबिट कार्डदेखील सापडले. तर वर्मा याच्याकडे 9 डेबिट कार्ड सापडली. ही कारवाई विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश चव्हाण, पोलिस हवालदार दीपक चव्हाण, संपत भोसले, प्रफुल्ल मोरे, संदीप देवकाते, शेखर खराडे आणि गितेश पिसाळ यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

Back to top button