

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, आपल्या समाजाची बाजू कशी मांडावी, याचा आदर्श मराठा नेत्यांनी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून घ्यावा. तसेच गोपीचंद पडळकर, नरहरी झिरवाळ हे नेतेदेखील अभिनंदनास पात्र आहेत. दुर्दैवाने मराठा नेते समाजासाठी पुढे येत नसल्याने, सध्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा हा लढा सुरू झाला आहे. त्यातूनच मनोज जरांगे-पाटील यांचे नेतृत्व समाजाने मान्य केले असून, आता आरक्षण मिळवणे, हेच आमचे अंतिम ध्येय असल्याचे उपोषणकर्त्या मराठा बांधवांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation)
संबधित बातम्या :
सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी रविवारी (दि.८) अंतरवाली सराटी गावचे मनोज जरांगे-पाटील भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांच्या वतीने संयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा नेत्यांंवर हल्लाबोल करण्यात आला. इतर समाजांच्या तुलनेत मराठा नेत्यांची संख्या अधिक आहे. मात्र, अशातही मराठा आरक्षणासाठी कोणी ठाम भूमिका घेताना दिसत नाही. गेल्या २३ दिवसांपासून आम्ही साखळी उपोषण करीत आहोत. त्यास दोन आमदार सोडले, तर कोणी भेटही दिली नाही. ही बाब खरोखरच संतापजनक आहे. वास्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याइतपत हजारो पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, अशातही कोणी पुढे येत नाही. शिंदे सरकारवर आमचा विश्वास असून, कायद्याच्या चौकटीत टिकेल, असे आरक्षण त्यांच्याकडून दिले जाईल, अशी अपेक्षाही उपोषणकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. (Maratha Reservation)
दरम्यान, रविवारी (दि. ८) सायंकाळी ६ ला मनोज जरांगे-पाटील उपोषणस्थळी भेट देणार असल्याने त्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. जरांगे-पाटील यांचे स्वागत वारकरी हे टाळ-मृदंगाच्या गजरात करणार आहेत. यावेळी शिवव्याख्याते कृष्णा महाराज धोंडगे (दुगावकर) यांचे आरक्षणावर कीर्तन होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील मराठा बांधव, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक उपस्थित राहणार असल्याचे नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, नितीन रोटे-पाटील, योगेश नाटकर, संजय फडोळ, ॲड. कैलास खांडबहाले, ॲड. अजित तिदमे, योगेश कापसे, श्रीराम निकम, विकी देशमुख, संजय देशमुख, चंद्रकांत बच्छाव, संदीप खुंटे-पाटील, शरद लभडे, संदीप बरहे, विकी गायधनी, ज्ञानेश्वर सुरासे, महेंद्र बेहेरे, प्रकाश चव्हाण, गणेश पाटील, विशाल निकम, भास्कर पाटील यांनी सांगितले.
…तर निवडणुकीत ताकद दाखवू
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचे स्वरूप सामाजिक आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा लढा सुरू आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, सरकार समाजाला आरक्षण देण्यास अपयशी ठरल्यास, आगामी निवडणुकांमध्ये समाजाची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी दिला.
हेही वाचा :