‘उजनी’ निम्मेच भरले, दुष्काळ इंदापूरच्या उंबरठ्यावर | पुढारी

‘उजनी’ निम्मेच भरले, दुष्काळ इंदापूरच्या उंबरठ्यावर

भरत मल्लाव

भिगवण : यंदा उजनी रडतखडत 50 टक्के भरले आहे. इंदापूर तालुक्यातील बहुतांश लहान-मोठे तलाव कोरडेठाक आहेत. आता पावसाळा संपल्याने पाण्याच्या उरल्यासुरल्या आशा धूसर झाल्या आहेत, त्यामुळे यंदाची पाण्याची परिस्थिती पाहता इंदापूर तालुक्यात शेतकरी व मच्छीमारांच्या उंबरठ्यावर दुष्काळ येऊन ठेपला आहे. येत्या काही महिन्यांत उजनीच्या पाण्याचा राजकीय संघर्ष पराकोटीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्यावरून होणार संभाव्य राजकीय संघर्ष टाळण्यासाठी उजनीच्या पाण्याचे नियोजन आताच होणे गरजेचे बनले आहे. वास्तविक, उजनी धरण भरल्यानंतर 117 टीएमसी पाणी वर्षभरात पुरत नाही, हा दरवर्षीचा अनुभव आहे. शंभर टक्के उजनी भरून दरवर्षी पाणलोट क्षेत्रात भीषण पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती जाणवत असते. मार्च ते जून या चार महिन्यांत उजनीतील उपयुक्त पाणीसाठा संपून तो उणेत जाऊन बसतो आणि त्या पाण्यावरून नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांचे राजकारण तापलेले असते.

संबंधित बातम्या :

उजनीच्या पाण्याबाबत मुळातच पाणी वाटप सल्लागार समिती नसल्याने पाणी सोडण्याची सूत्रे बड्या नेत्यांच्या इशार्‍यावर चालतात, हे जगजाहीर झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. उजनीच्या पाण्याचा थेंबन् थेंब वापरता यावा, यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या व मातब्बर नेत्यांनी खालील बाजूला जमिनी घेतल्या आहेत. वरून औद्योगिकीकरणाचे जाळेही विणून ठेवले आहे. याव्यतिरिक्त सोलापूरसह शिरापूर, आष्टी, बार्शी, एकरुख, दहिगाव, जोड कालवा, सीना, भीमा, सांगोला, मंगळवेढा या गावांच्या उपसा योजना अवलंबून आहेत. यातूनच मग उजनीच्या पाण्यावर होणारी आंदोलने ही राजकीय प्रेरित असतात, हेही लपून राहिले नाही. मात्र, याचा थेट परिणाम खर्‍या धरणग्रस्त व भूमिपुत्रांवर आणि शेतकर्‍यांवर होतो, हेदेखील नाकारता येत नाही. यातूनच शेतकरी व मच्छीमार दरवेळी बळी ठरत आलेले आहेत.

पुण्याच्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चार धरणांचे 29.30 टीएमसी पाणी 55 लाख लोकसंख्या असलेल्या पुणेकरांना तसेच बारामती, दौंड, इंदापूर शेतीसिंचनाला पुरते आणि इथे उजनीचा 117 टीमसी पाणीसाठा असूनही पाण्याची बोंब ठरलेली असते. यातून उजनीच्या पाण्यात राजकीय हात किती खोलवर बुडाले आहेत, याची प्रचिती येते. या वर्षी पाऊस सर्वदूर न होता ठरावीक भागांत झाला. उजनी धरण तर पूर्णपणे पुणे जिल्ह्याच्या वरच्या भागातील घाटमाथ्यावरच्या पावसावर व धरणातील पाण्यावर अवलंबून असणारे धरण आहे. साहजिकच, पुणे विभागातील धरणे भरली असली, तरी उजनी भरण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नाही. याचा विपरीत परिणाम होऊन उजनीने केवळ पन्नासी गाठली आहे. सध्याचा हा साठा उन्हाळ्यात असतो तेवढा आहे. त्यामुळे पुढील वर्षभर हा पाणीसाठा कसा पुरणार? हा गंभीर प्रश्न आहे. त्यातही पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असा निकष लागला, तर तीन जिल्ह्यांतील शेती व्यवसायावर गंभीर संकट उभे आहे.

या धरणावर शेतीएवढाच मासेमारी व्यवसाय चालतो. मात्र, या व्यवसायवरही सावट पसरले आहे. पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाणीसाठा असल्याने आताच व्यवसाय डबघाईला आला आहे. येत्या काही महिन्यांत तर मच्छीमारांची उपासमार निश्चित आहे. इंदापूर तालुक्यात पावसाने शेवटच्या पंधरवड्यात हजेरी लावून काहीसा दिलासा दिला असला, तरी तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडीसह लहान-मोठे तलाव कोरडे किंवा अत्यल्प भरले आहेत. त्यामुळे तलावावर अवलंबून असणारा शेतीव्यवसाय अडचणीत सापडला आहे.

Back to top button