Pune News : विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरला मंजुरी | पुढारी

Pune News : विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरला मंजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उड्डाणपुलासह ग्रेड सेपरेटर उभारण्यास व त्यासाठीच्या 63 कोटी रुपये खर्चास महापालिकेच्या पूर्वगणन (एस्टिमेट) समितीने मंजुरी दिली आहे. या कामांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी या चौकात उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या कामासाठी 63 कोटी रुपयांच्या खर्चास एस्टीमेट समितीने शुक्रवारी (दि.6) मंजुरी दिली. या कामासाठी सध्या अस्तित्वात असलेला लोखंडी पादचारी पूल हटविण्यात येणार आहे. तसेच सेवा वाहिन्याही हटवाव्या लागणार आहेत.
संबंधित बातम्या :
येथील उड्डाणपुलाची लांबी 630.12 मीटर असून, पुलाची रुंदी 7 मीटर असणार आहे. हा उड्डाणपूल आळंदीच्या बाजूस 197.12 मीटर, लोहगावच्या बाजूस 142 मीटर असून, एकूण गाळे 11 असणार आहेत. तर ग्रेड सेपरेटरची एकूण लांबी 595 मीटर, रुंदी 7 मीटर, आळंदीच्या बाजूस 185 मीटर, लोहगावच्या  बाजूस 150 मीटर, येरवड्याच्या बाजूस 140 मीटर असणार आहे.
या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी मी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिकडे पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नाना यश आले असून, महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी 63 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आळंदी रस्ता, धानोरी रस्ता आणि विमानतळ रस्त्याकडे जाणार्‍यांचा मार्ग सुकर होणार आहे. 
                                          – सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी घोरपडी येथील उड्डाणपुलासही मंजुरी
घोरपडी येथे मिरजकडे जाणार्‍या रेल्वे मार्गावर रेल्वे क्रॉसिंगच्या वेळी गेट बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. येथील कोंडीवर त्वरित मार्ग करण्याची मागणी सातत्याने होती. त्यामुळे तेथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, त्यासाठी संरक्षण विभाग व रेल्वेच्या जागेचे संपादन करावे लागणार होते. त्यासाठी या दोन्ही विभागांची मान्यता आवश्यक होती. या रेल्वे उड्डाणपुलासाठी संरक्षण विभागाची मान्यता मिळाली असून, रेल्वेची मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या उड्डाणपुलासाठी 47 कोटी रुपयांच्या खर्चाला एस्टीमेट समितीने मान्यता दिली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील रस्तारुंदीकरण अंतिम टप्प्यात
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीसाठी कमी रस्ता उपलब्ध होत असल्याने येथील रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यालगतच्या शासकिय आणि खासगी इमारतींच्या बहुतांश जागा ताब्यात आल्या असून, काही खासगी बंगल्यांच्या सीमाभिंती तोडून त्या बांधून द्याव्या लागणार आहेत तसेच येथील सेवावाहिन्या शिफ्टिंगचेही काम सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पाहणी केली असून, ही कामे 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. येथील वाहतूक सुरळीत ठेवून उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेचे कामही गतीने सुरू करण्यास मदत होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Back to top button