Pune News : ड्रायव्हरच्या मदतीने ड्रग तस्कर ललित पळाला | पुढारी

Pune News : ड्रायव्हरच्या मदतीने ड्रग तस्कर ललित पळाला

अशोक मोराळे

पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील याला पुण्यातून मुंबईच्या दिशेने चारचाकी गाडीतून रावेतपर्यंत घेऊन जाणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी हडपसर परिसरातून ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दत्ता डोके (वय 35, रा. हडपसर) असे त्याचे नाव आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. पाटील याच्यासोबत ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सोळामध्ये आरोपी असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कातील डोके ही व्यक्ती आहे. त्याच व्यक्तीकडे तो चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करीत असल्याची माहिती आहे. पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर डोके यानेच त्याला चारचाकी गाडीतून रावेतपर्यंत सोडल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. त्यामुळे पाटील याने प्लॅनिंग करून ससून रुग्णालयातून पळ काढला, यावर तपास यंत्रणांनी शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दै. ‘पुढारी’ने ‘ऑफ द रेकॉर्ड’ या सदरात ड्रग तस्कर पाटील हा कारवाई झाल्यापासून 36 तासांत प्लॅनिंग करून पळाला, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये पाटीलसोबत त्याच वॉर्डमध्ये आरोपी असलेल्या का व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजाविल्याचा पोलिसांना संशय होता. याबाबत बोलताना एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, पाटील याने ससून रुग्णालयातून एक्स-रेसाठी घेऊन जात असताना सोमवारी रात्री पळ काढला होता. ससूनमधून पळाल्यानंतर तो डोक्याला टोपी, तोंडाला मास्क आणि अंगावर काळे जॅकेट घालून लेमन ट्री हॉटेलमध्ये जाताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसला होता. तेथून तो एका चारचाकी गाडीत बसून पळाला होता. साधू वासवानी चौक, पुढे बंडगार्डन परिसरापर्यंत तो दिसून येत होता. त्यानंतर डोके याने त्याच्याकडील चारचाकी गाडीतून पाटील याला रावेतपर्यंत पळवून तेथे सोडले. पाटील पलायनप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने गुन्हे शाखेचे पथकदेखील याचा तपास करीत होते.

ससून रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली तेव्हा डोके हा ललित पाटील याला चारचाकी गाडीतून घेऊन जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानुसार शुक्रवारी त्याला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले आहे. पाटीलला ससून रुग्णालयातून पळवून लावण्यात त्याच्यासोबत असलेल्या एका आरोपीची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय सुरुवातीपासून पोलिसांना होता. डोके हा त्याच व्यक्तीचा माणूस असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पाटील याने पूर्वनियोजन करूनच ससून रुग्णालयातून पळ काढल्याचे दिसून येते आहे.

Back to top button