वेल्हे : पशुवैद्यकीय दवाखान्यातील 80 टक्के पदे रिक्त | पुढारी

वेल्हे : पशुवैद्यकीय दवाखान्यातील 80 टक्के पदे रिक्त

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात 80 टक्के पशुधन अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांवर दवाखान्याचा कारभार सुरू आहे. पन्नास टक्के दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक नसल्याने उपचाराअभावी जनावरांचा मृत्यू होत आहे. कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक, कर्मचार्‍यांना पाच महिन्यांपासून पगारही मिळालेला नाही.

पानशेत धरण खोर्‍यातील शिरकोली (ता. वेल्हे) येथील दवाखान्यात अनेक महिन्यांपासून पशुधन पर्यवेक्षक नाही. उपचार न मिळाल्याने गावातील रघुनाथ साळेकर यांच्या म्हशीचा मृत्यू झाला, अशी तक्रार स्थानिक सरपंच अमोल पडवळ यांनी केली आहे. वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तसेच करंजावणे व विंझर येथे राज्य शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तेथे कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या तीन दवाखान्यात तीन कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत.

साखर,शिरकोली, वेल्हे व रांजणे या जिल्हा परिषदेच्या चार दवाखान्यांत पशुधन पर्यवेक्षक नाहीत. तालुक्यात शासनाचे फक्त एकच पशुधन विस्तार अधिकारी व तीन शिपाई असे चारच कर्मचारी आहेत. दहापैकी पाच दवाखान्यांचा कारभार कंत्राटी कामगार पहात आहेत. पगार नसल्याने त्यांना ये जा करण्यासाठी पेट्रोललाही पैसे नाहीत, अशी त्यांची स्थिती आहे. एकमेव शासकीय पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद काथवटे हे तालुक्यातील सर्व दवाखान्यांचा कारभार पाहत आहेत. दुसरे शासकीय कर्मचारी एच. डी. सोरटे हे राजगडच्या वाजेघर दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक म्हणून कामकाज पहात आहेत.

याबाबत डॉ. शरद कादवटे म्हणाले, कर्मचा-यांची 80 टक्के पदे रिक्त आहेत. त्यात फक्त तीन कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. अत्यल्प कर्मचारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. लसीकरणासाठी धावपळ करावी लागत आहे.

पशुधन धोक्यात
वेल्हे तालुक्यात गाई-बैलांची संख्या 9 हजार आहे, तर म्हशींची संख्या 20 हजारांहून अधिक आहे. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. ते सरकारी दवाखान्यावर अवलंबून आहेत. सरकारी दवाखाने एकापाठोपाठ एक बंद पडत असल्याने तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे.

हेही वाचा :

खडकवासला साखळीत अर्धा टीएमसीची भर

बारामती : अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे आव्हान ; अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

Back to top button