बारामती : अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे आव्हान ; अज्ञात चालकावर गुन्हा दाखल | पुढारी

बारामती : अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे आव्हान ; अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती-मोरगाव रस्त्यावर तरडोली येथे सोमवारी (दि. 19) झालेल्या अपघातात ठार झालेल्या दोघांपैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दरम्यान, याप्रकरणी सुपे पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुपे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नागनाथ पाटील व उपनिरीक्षक वसंत वाघोले यांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. तरडोलीजवळ झालेल्या अपघातात दत्तात्रय दिनकर जाधव (वय 65, रा. मारुती मंदिराजवळ, माळेगाव खुर्द, ता. बारामती) हे ठार झाले. त्यांच्याकडील दुचाकीवर (एमएच 42 एटी 5991) पाठीमागे आणखी एक व्यक्ती बसलेली होती. तीदेखील या अपघातात ठार झाली आहे.

संबंधित बातम्या  :

परंतु, ही व्यक्ती नेमकी कोण, याबद्दल अद्याप पोलिसांनाही माहिती मिळालेली नाही. जाधव यांच्या कुटुंबांनाही या व्यक्तीबद्दल माहिती नाही. जाधव हे भाद्रपदी यात्रेमुळे मोरगावला पहाटे दर्शनासाठी चालले होते. या वेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोस दिली. त्यात दुचाकीवरील दोघे ठार झाले होते. याप्रकरणी मयूर संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाय अन्य एका मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या मृत व्यक्तीचे वय अंदाजे 55 ते 60 असून, अंगावर पिवळ्या रंगाचा हाफ बाह्याचा शर्ट, लाल रंगाची नाइट पँट आहे. याप्रकरणी कोणास काही माहिती असल्यास सुपे पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button