Pawar vs Pawar : बारामती लोकसभेला पार्थ-सुप्रिया लढतीचीच चर्चा | पुढारी

Pawar vs Pawar : बारामती लोकसभेला पार्थ-सुप्रिया लढतीचीच चर्चा

राजेंद्र खोमणे

नानगाव : जुलै महिन्यातील राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात खा. शरद पवार यांची कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्यात आगामी निवडणुकीत लढत होणार आणि घरच्या मैदानातच शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने येणार, अशी सुरू झालेली चर्चा थांबण्याचे नाव घेईना. यंदाच्या बारामती लोकसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचे यामुळे लक्ष लागणार आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट पाहता येणार्‍या लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल? याचा अंदाज आत्तापासूनच राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पार्थ पवार यांची उमेदवारी असेल, तर अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागून यंदाची निवडणूक खूपच लक्षणीय होणार असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रश्न मार्गी

Maratha Reservation Protest : मराठा समाजाचा विश्वासघात होऊ नये, हीच अपेक्षा : रोहित पवार

पुण्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करा : अजित पवार

मागील विधानसभा निवडणुकीत ‘सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल’ असा सामना झाला होता. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होती, तर ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस’ अशीच थेट लढत झाली. सध्याचे राजकीय समीकरण पाहता अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार व शरद पवार हे दोन गट पडले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी असेल, तर अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आणि मतदारांनादेखील एकच काय ते ठरवावे लागणार आहे. भाजपचे चारशे प्लसचे गणित आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे दौरे, यामुळे सुप्रिया सुळे यांना यंदाची लोकसभा निवडणूक तशीही अडचणीची ठरणार होती. आता निवडणूक जिंकण्याचा त्यांचा हुकमी एक्काच त्यांच्यासोबत नसल्याने आगामी निवडणूक खा. सुळे यांना फारच कठीण जाणार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, भोर, पुरंदर, दौंंड, बारामती, खडकवासला; तर शहरी भागातील कोथरूडचा काही भाग, बावधन, लवळे, भुगाव, ताथवडे, कात्रज, धायरी, वारजे असाही शहरी पट्टा जोडलेला आहे. त्यामुळे शहरी भागात तेथील वातावरणानुसार निवडणूक दिसून येते, तर ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आहे. यामध्ये 2009 मध्ये मसुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांता नलवडेफ असा सामना झाला होता. त्यामध्ये 3,36,831 मताधिक्य सुळे यांना मिळाले होते. 2014 च्या निवडणुकीत मरासपचे महादेव जानकर विरुद्ध सुप्रिया सुळेफ असा सामना झाला होता. या वेळी सुळे यांना 69,719 मताधिक्य मिळाले होते, तर 2019 च्या निवडणुकीत मकांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळेफ अशी लढत झाली होती. या वेळी सुळे यांना 1,55,774 मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे सर्व निवडणुकांचा अंदाज घेतला, तर सुळे यांच्या मताधिक्यात घट होताना दिसत आहे. राष्ट्रवादी एक असताना अशी परिस्थिती होती.

आतातर फुटलेली राष्ट्रवादी आहे. सध्या परिस्थिती वेगळी आहे, हे विसरून चालणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे व कांचन कुल यांची मतांची तफावत पाहिली तर बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर या मतदारसंघांत सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या; तर दौंंड व खडकवासला येथे कांचन कुल यांना आघाडी मिळाली होती. या निवडणुकीत मराष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपफ अशी थेट लढत झाली होती. मात्र, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांच्याबरोबर असलेले प्रत्येक तालुक्यातील मोठे नेते, यामुळे सध्याची बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वच राजकीय गणिते बदलली असल्याची वस्तुस्थिती आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्यास खासदारदेखील जास्त प्रमाणात निवडून आणावे लागतील, त्यामुळे येणार्‍या निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे वरिष्ठ नेतेमंडळी बोलून दाखवत आहेत. अजित पवारांचादेखील नरेंद्र मोदी यांना पाठिंबा असून, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे त्यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमातदेखील सांगितले आहे. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात मशरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटफ अशीच चुरस असून, मसुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवारफ असा थेट सामना लढला जाईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तर, भाजपदेखील असाच मप्लानफ करीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे देशातील विरोधकांच्या आघाडीचे महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांना बारामतीतच अडकविण्यात भाजप यशस्वी होणार आहे.

हेही वाचा :

मंदिरांचा वापर राजकारणासाठी केला जाऊ शकत नाही : केरळ उच्‍च न्‍यायालय 

तब्बल ३९ वर्ष ठाकरेंसोबत होतो, त्यांची कुंडली माहितीय : नितेश राणे

Back to top button