पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रश्न मार्गी | पुढारी

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे प्रश्न मार्गी

पिंपरी : महापालिका हद्दीतील वडिलोपार्जित जमिनीवर बांधलेल्या घरांचे वाटपपत्र आता पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानुसार मिळकतीच्या नोंदी होऊन मिळकतकर भरणे सोपे होईल. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या नोंदी बंद केल्या होत्या, त्यामुळे अनेकांचा कर थकीत होता. ही समस्या लक्षात घेऊन पाचशे रुपयांच्या स्टॅप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकत कराच्या नोंदी करून घेण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी दिला आहे.

नव्याने वाटपपत्र करून नोंदी करताना सामायिक जागेचे मूल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने अंमलबजावणीच्या सूचना दिल्यानंतर पालिकेने नव्याने परिपत्रक काढून नोंदी करून घेणार असल्याचे आदेश दिला आहे. कोणत्याही प्रश्ना संदर्भात नागरिकांची अडवणूक करू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

महापालिका हद्दीतील बहुतेक स्थानिक नागरिक सामायिक गट नंबर असलेल्या जागेत घरे बांधतात. त्यामुळे बहुतांश खरेदी- विक्री या प्रक्रियेशिवाय स्थानिकांच्या घरांची बांधकामे होतात. यापूर्वी अशा घरांच्या नोंदी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे करण्यासाठी 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर वाटणीपत्र करून नोंदी होत होत्या; परंतु अलीकडच्या काळामध्ये पालिकेमार्फत अशा नोंदी थांबविल्या होत्या. घराची जागा कमी असूनसुद्धा वाटपपत्रासाठी नागरिकांना संपूर्ण जागेची स्टॅम्प ड्युटी भरून वाटपपत्र करावे लागत होते.

सामायिक जागेतील बांधकामाचे मूल्यांकन जास्त असल्याने वाटपपत्रासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे. परिणामी स्थानिक नागरीक मिळकतकराची नोंद होत नसल्याने कर भरु शकत नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून यामध्ये सुधारणा करण्याची आग्रही मागणी होती. आता 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवरही नोंदी करता येतील. हा प्रश्न काळेवाडी, चिखली, तळवडे, मोशी, भोसरीमध्ये होता. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पालिकेने आता 500 रुपयांच्या स्टँप पेपरवरील वाटणीपत्रानुसार मिळकतकराच्या नोंदी करून घेण्याचा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे.

हेही वाचा

पिंपरी : अनधिकृत बांधकाम मालमत्ता नोंदणीचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांसह आमदार टक्केवारीसाठी अधिकार्‍यांना धमकावतात; खासदार जलील यांचा आरोप

बैल पोळ्यावर लम्पीचे सावट !!

Back to top button