पुण्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करा : अजित पवार | पुढारी

पुण्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करा : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘विकास प्रकल्प हे निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी अडून राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’ संस्थेचे पुण्यातील मुख्यालयाच्या कामासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी,’ असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, तसेच संबंधित जिल्ह्यांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

पुणे मेट्रो रेल्वेच्या तिन्ही प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. पुणे बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामाने वेग घेतला आहे. वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही मार्गी लागले आहे. ‘सारथी’ संस्थेचे कामकाज अधिक व्यापक, गतिमान करण्यासाठी ‘सारथी’चे पुण्यातील मुख्यालय, औंध, कोल्हापूर, नाशिक, नागपूर येथील विभागीय केंद्रांची बांधकामे वेळेत पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. विकासकामांची ही गती अशीच कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंमलबजावणीतील अडथळे दूर करा

विकास प्रकल्पांना आवश्यकतेनुसार राज्य आणि केंद्र शासनाची मंजुरी मिळवणे, निविदा प्रक्रिया गतिमान करणे, विकासकामांच्या आड येणारी अतिक्रमणे तातडीने हटवणे, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करणे, प्रशासकीय तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे आदी बाबी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

हेही वाचा

Dabholkar murder case : डॉ. दाभोलकर खून प्रकरणात सरकारी साक्षी पुरावे संपले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटीत दाखल; जरांगे पाटलांची घेतली भेट

मुख्यमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही; जरांगे यांचा निर्धार

Back to top button