अधिक मिठामुळे वाढले हृदयविकाराचे प्रमाण | पुढारी

अधिक मिठामुळे वाढले हृदयविकाराचे प्रमाण

लंडन : जागतिक आरोग्य संघटना आरोग्यासंदर्भात वारंवार सूचना देत असते. कोणत्या आजारापासून कसे सावध राहिले पाहिजे, कोणता आजार गंभीर आहे आणि कोणता नाही, याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेकडून दिली जाते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मिठाबाबतची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. खासकरून प्रमाणाबाहेर मिठाचं सेवन करणार्‍यांसाठी ही माहिती उपयुक्त आहे. ही माहिती देताना जगभरात अधिक प्रमाणात मीठ खाणार्‍यांच्या बाबत काय झालं, याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जगभरातील हृदयरोगाशी संबंधित आजार वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

आरोग्य संघटनेच्या मते, युरोपात रोज किमान 10 हजार लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे. म्हणजे वर्षाला 40 लाख लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे. म्हणजे युरोपातील मृत्यूंच्या संख्येच्या 40 टक्के मृत्यू केवळ हृदयाशी संबंधित आजाराने होत आहेत. मिठाचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने हे मृत्यू होत आहेत. मिठाच्या सेवनाचं प्रमाण कमी केल्यास हा आकडा कमी होऊ शकतो. मिठाचं सेवन किमान 25 टक्के कमी केलं पाहिजे. तसं झाल्यास 2030 पर्यंत 9 लाख मृत्यू रोखता येऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपातील डायरेक्टर हँस क्लूज यांनी सांगितलं. युरोपात 30 ते 79 वयोगटातील तीनपैकी एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित आहे. त्याचं मुख्य कारण मीठ आहे.

युरोपात 53 पैकी 51 देशांत प्रतिदिन मिठाचं सेवन करण्याचं प्रमाण 5 ग्रॅमपेक्षा अधिक आहे. आरोग्य संघटनेने 5 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे एक चमचा किंवा त्यापेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु युरोपात त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. प्रोसेसड् फूड आणि स्नॅक्स खाण्यावर युरोपातील लोक भर देतात, त्यात मिठाचं सर्वाधिक प्रमाण असतं. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, असं सांगण्यात येत आहे. प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असं आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

Back to top button