

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण प्रश्नी मागील १७ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आज (दि. १४) अखेर उपोषण मागे घेतले. जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन उपोषण सोडले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हंटलं आहे," भविष्यात त्यांचा आणि मराठा समाजाचा विश्वासघात होऊ नये". (Maratha Reservation Protest)
राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ देत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (दि. १२) जाहीर केला हाेता. "सरकारला एक महिन्याचा वेळ देतो; पण ही जागा सोडणार नाही. एक महिन्याच्या आत सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल. महिन्यानंतर आरक्षण दिलं नाही तर पुन्हा उपोषण करणार. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाचं ठिकाण सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि. 14)अंतरवाली सराटीत आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर आदी आंदोलनस्थळी उपस्थित होते.
समाजाच्या हिताचा निर्णय जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी मी भूमिका घेतली होती. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कोणाकडे आहे तर ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या मतावर मी ठाम आहे, अशी ग्वाही जरांगे पाटील यांनी आज मराठा समाज बांधवांना दिली.
जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी 'X' वर पोस्ट करत म्हंटलं आहे, "मनोज जरांगे हे निर्मळ मनाचे आणि प्रामाणिक आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी १७ दिवसांनी आपलं उपोषण मागे घेतलं पण भविष्यात त्यांचा आणि मराठा समाजाचा विश्वासघात होऊ नये, हीच अपेक्षा!
हेही वाचा