महाराष्ट्राची शान असलेल्या ‘खिल्लार’ला पोहोचविले घराघरांत | पुढारी

महाराष्ट्राची शान असलेल्या ‘खिल्लार’ला पोहोचविले घराघरांत

वर्षा कांबळे

पिंपरी(पुणे) : बैलगाडा शर्यतीवर 2018 मध्ये बंदी घालण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त पसंती असणार्‍या खिल्लार जातीच्या बैलांची पैदास कमी होऊ लागली. कालांतराने महाराष्ट्राची शान असणारी खिल्लार बैलांची जात दुर्मिळ होण्याचा धोका लक्षात घेत सूरज दिघे या तरुणाने पुढाकार घेत सोशल मीडियातून रान उठविले. खिल्लार नावाचे यू-ट्यूब चॅनेल चालवून देशी गोवंशाचे जतन, संवर्धन करण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या दावणीची शान असलेला खिल्लारला घराघरांत पोचविले.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणार्‍या सूरज दिघे या तरुणाने बैलगाडा शर्यती बंदीच्या काळामध्ये खिलार महाराष्ट्र शान यू ट्यूब चॅनेलमधून 2018 पासून बैलगाडामालक यांच्या मुलाखती घेऊन पेटा संघटना आणि न्याय व्यवस्थेशी संबंधित व्यक्तींना बैलगाडा शर्यत काही अटीवर सुरू करणे गरजेचे आहे. याचे महत्त्व पटवून दिले. आज बैलगाडा शर्यती सुरू आहेत, त्यामध्ये सूरज याचा सहभाग अतिशय मोलाचा आहे.

या कामाची सुरुवात ही पंढरपूर पायी वारीमध्ये झाली. पंढरपूरच्या विठ्ठलाने दिलेली कल्पनाच जणू. सूरज याने बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी घेतली आहे. एका खासगी कंपनीत नोकरी करत असतानाही खिल्लार जात वाचावी म्हणून कामातून वेळ काढून त्याने खिल्लार नावाचे यू ट्यूब चॅनेल सुरू केले. आज महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एकमेव अद्वितीय चॅनेल आहे. त्यांचे लाखात फोलॉअर्स आहेत. खिल्लार बैल आणि खिल्लार गायी असलेल्या शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करून पैदास वाढविली.

महाराष्ट्र आणि कनार्टक राज्यात लाखो किलोमीटरचा प्रवास

खिल्लारचे चित्रीकरण करण्यासाठी त्याने स्वखर्चाने महाराष्ट्र आणि कर्नाटक असा प्रवास केला. कधी हॉटेल किंवा कधी पेट्रोल पंपावर रात्र काढून तेथील शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती घेताना पूर्वतयारी करून नेमकी माहिती घेणे. त्यासाठी प्रश्नावली करणे. एकाच वेळी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, यू ट्युब चॅनेलवर संबंधित मुलाखत शेअर करणे. या माध्यमातून खिल्लार जातीच्या बैलाविषयीची माहिती पोचवण्याचे काम या तरूणाने केले.

मुलाखतीदरम्यान उच्च प्रतीच्या तंत्रसाधनांचा वापर करणे. एडिटिंग करणे, डबिंग करणे यामुळे हे चॅनेल शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. या कामाचे संपूर्ण श्रेय सूरज महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना, खिलार क्षेत्रातले जुने जाणकार, अभ्यासक लोकांना देतो; तसेच त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नीने आणि कुटुंबाने खूप मोठी जबाबदारी पार पाडली.

खिल्लार जातीच्या बैलांच्या खरेदी-विक्रीतून शेतकर्‍यांच्या कुटुंबास मोठा हातभार लागतो. जवळपास 10 ते 15 लाखांपर्यंत यांची विक्री होते. बैलगाडा शर्यत बंदीच्या काळात खिल्लार जातीच्या बैलांची किंमत 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे या जातीच्या बैलांची पैदासच थांबली. महाराष्ट्राची शान असलेली खिल्लार जात दुर्मिळ होऊ लागली. या चॅनेलच्या माध्यमातून जनजागृती करून पैदास वाढविली आहे. आता एखाद्या गोर्‍ह्याची किंमतदेखील 5 लाखांपर्यंत आहे.

-सूरज दिघे, पशूप्रेमी

हेही वाचा

Sangali : पलूस तालुक्यात विश्वजित कदम यांच्या जनसंवाद पदयात्रेस उसळला जनसमुदाय

पोळ्यानिमित्त आज कान्हूरपठारला मिरवणूक

शिंदे गटाला भाजपचा शह? .. ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागांवर दावा

Back to top button