दौंड तालुक्यात यंदा सर्वात कमी पाऊस | पुढारी

दौंड तालुक्यात यंदा सर्वात कमी पाऊस

रामदास डोंबे

खोर : सन 2018 नंतर सर्वांत मोठा दुष्काळ हा दौंड तालुक्याने पाहिला आहे. यावर्षी सर्वांत कमी प्रमाणात पाऊस हा या तालुक्यात झाला. बहुतांश गावांत पावसाअभावी आज शेतीसह पिण्यालाही पाणी नाही. बळीराजाच्या डोळ्यांत मात्र पाणी आल्याचे चित्र पाहावयास
मिळत आहे. यंदा दौंड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खोर, भांडगाव, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी, रोटी, हिंगणीगाडा, जिरेगाव, वासुंदे, पाटस, वरवंड, वाखारी, चौफुला परिसरातील बहुतांश खरिपाची पिके जळून अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. ज्या ठिकाणी तुरळक, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे, तेथील शेतकर्‍यांनी बाजरीची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊसच पडला नसल्याने उगवलेल्या बाजरीचे पीक वाया गेले. त्यानंतरही पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणी करता आली नाही.

अंजीर बागांना टँकरने पाणी घालण्याची वेळ
तालुक्याच्या दक्षिण भागात शेतीसाठी पाण्याचा कुठल्याही प्रकारचा स्रोत उपलब्ध नसल्याने आजही या भागातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पाऊसच नसल्याने शेती पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. खोर परिसरात तर अंजीर बागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. बागांना पाण्याची कमतरता भासू लागल्याने अनेक शेतकरी हे थेट टँकर आणून बागेला पाणी घालत आहेत..

दौंड तालुक्यामध्ये खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 4 हजार 300 हेक्टर आहे. त्यामध्ये बाजरी हे मुख्य पीक आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र 3 हजार 77 हेक्टर असून, तुरळक पावसावर 2 हजार 977 हेक्टर वर पेरणी झाली आहे. मात्र, पेरणी झालेल्या पिकांना आता पावसाची आवश्यकता आहे. आजही शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.
                                                            -राहुल माने, कृषी अधिकारी, दौंड.

पावसाअभावी हाताशी आलेल्या अंजीर बागा जळून जाण्याच्या वाटेवर आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंजीर फळ पिकण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, पाणी नसल्याने हे फळ गळून जाण्याची भीती आहे. उपलब्ध पाण्यावर 50 टक्के शेतकर्‍यांनी टँकरच्या साहाय्याने पाणी घालून बागा जगविल्या. मात्र, पुढे पाणी मिळाले नाही, तर मोठे संकट उभे राहणार आहे. एकरी अंजिराला 2 लाख रुपये बागा आणण्यासाठी खर्च येतो. आज सर्व खर्च पाण्याच्या अभावामुळे मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे.
                        -जालिंदर डोंबे व गणेश डोंबे, अंजीर उत्पादक शेतकरी, खोर. 

हेही वाचा :

पुणे : 66 लाखांची फसवणूक करणार्‍या सायबर चोरट्याला बिहारमधून अटक

पुणे : कचर्‍यातून पत्ता शोधून केला दंड महापालिकेची मोहीम

Back to top button