‘शिवरायांचे असामान्य जीवन व कर्तृत्व’ यावर आज डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत व्याख्यान

‘शिवरायांचे असामान्य जीवन व कर्तृत्व’ यावर आज डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत व्याख्यान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत सोमवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ साहित्यिक, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांचे 'छत्रपती शिवरायांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व' या विषयावर व्याख्यान होणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त युगपुरुष छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा, जाज्वल्य इतिहास विश्वास पाटील आपल्या खास शैलीत उलगडणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गेल्या 37 वर्षांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत यावर्षी विश्वास पाटील 34 वे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.

मराठीतील प्रथितयश लेखक विश्वास पाटील यांनी कथा, कादंबरी, नाटक या माध्यमातून मराठी भाषेत विपुल साहित्य लेखन केले आहे. त्यांची 1980 मध्ये 'आंबी' (कादंबरी), 1982 मध्ये 'कलाल चौक' कथासंग्रह प्रकाशित झाला. 1986 ला 'चलो दिल्ली' (अनुवादित संग्रह), तर 1988 ला ऐतिहासिक कादंबरी 'पानिपत' प्रकाशित झाली. 'चंद्रमुखी', 'पांगिरा' व 'महानायक' कादंबर्‍यांची हिंदीत भाषांतरे झाली आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे यंदाचे हे साडेतीनशेवे वर्ष आहे. यानिमित्त रयतेचे स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास 'छत्रपती शिवरायांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व' या विषयातून ते मांडणार आहेत.

या व्याख्यानास वेळेपूर्वी 15 मिनिटे सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news