कळंबच्या सुपुत्राचे चंद्रयान मोहिमेत योगदान | पुढारी

कळंबच्या सुपुत्राचे चंद्रयान मोहिमेत योगदान

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  कळंब (ता. आंबेगाव) येथील 34 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर शास्त्रज्ञ संदेश पोपट भालेराव यांचा चंद्रयान 3 मोहिमेत खारीचा वाटा आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यापासून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संदेश हा शेतकरी कुटुंबातील असून, त्याचे आई-वडील शेती करीत आहेत. शास्त्रज्ञ संदेशचे शिक्षण कळंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते कमलजादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळंबमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत झाले. तसेच अकरावी, बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय मंचर या ठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग डी. वाय. पाटील आकुर्डी या महाविद्यालयातून पूर्ण केले. सन 2009 मध्ये जीईटी (गेट) परीक्षा देऊन त्याचे इस्त्रोमध्ये निवड झाली. भारतीय इस्रो संस्थेत कार्यरत असताना त्याने आयआयटी मुंबईतून एम.टेक. केले.

सध्या श्रीहरिकोटा येथे इस्त्रो या संस्थेत ते मेकॅनिकल विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. संदेश हा लहानपणापासूनच हुशार होता. त्याला पुढील शिक्षणासाठी त्याचे चुलते किसन भालेराव, पांडुरंग भालेराव तसेच चुलत भाऊ कृषी अधिकारी विकास भालेराव आणि ऑटोमोबाईल इंजिनीअर असणारे अनुज इंजिनीअरिंगचे उद्योजक सचिन भालेराव यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. त्यातूनच संदेश हा घडला असून, इस्रो या संस्थेत सन 2011 पासून ते कार्यरत आहेत. चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर संदेश आणि त्याच्या पालकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिक्षकांनी संदेशचे अभिनंदन केले आहे. संदेशच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयामार्फतही संदेशचे अभिनंदन करण्यात आले.

Back to top button