पुणे : कामात सुधारणा करा; अन्यथा निविदा रद्द | पुढारी

पुणे : कामात सुधारणा करा; अन्यथा निविदा रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारांकडून योग्यप्रकारे काम होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेला मोठ्या प्रमाणात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कामात सुधारणा करा; अन्यथा निविदा रद्द केली जाईल, असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांना दिला आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये जवळपास 1288 स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे.

यामध्ये सार्वजनिक युरिनल, सार्वजनिक शौचालय आणि वस्तीपातळीवरील शौचालयांचाही समावेश आहे. या सर्व स्वच्छतागृहांची दररोज दोनवेळा स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांवर होती. मात्र, कर्मचार्‍यांकडून या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नसल्याच्या आणि त्यामुळे दुर्गंधी सुटत असल्याच्या तक्रारी येत होत्या. महापालिकेने केअरटेकर नसलेल्या शहरातील 9743 स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पाच झोननुसार पाच ठेकेदारांची नेमणूक केली आहे. यासाठी महापालिकेच्या 34 आणि ठेकेदारांच्या 24 अशा जेटिंग मशिन असलेल्या गाड्या कार्यान्वित आहेत. मात्र, ठेकेदारांकडूनही स्वच्छतागृहांची योग्य पद्धतीने स्वच्छता केली जात नसल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या ः 292
वस्तीपातळीवरील स्वच्छतागृहांची संख्या ः 822
सार्वजनिक युरिनल ः 174
एकूण स्वच्छतागृह ः 1288

ठेकेदारांची बाजू

स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नसते.
शहरात वाहतूक कोंडी असते, त्यामुळे आठ तासांत दोनवेळा स्वच्छता करणे शक्य होत नाही.
नागरिकांची ये-जा असते, त्यामुळे स्वच्छतेला वेळ मिळत नाही.
महापालिकेने दिलेल्या
35 गाड्या जुन्या आहेत.

ठेकेदारांच्या त्रुटी
दररोज दोनवेळा स्वच्छता केली जात नाही.
महिन्यात एकदा संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) होत नाही.
अतिरिक्त टाकी नसते.
रुटमॅप नसतो.
नोजल पाइपची लांबी कमी असते.
स्वच्छतेच्या वेळा पाळल्या जात नाहीत.

हेही  वाचा :

नाशिक : कांदा उत्पादकांचे आंदोलन अखेर मागे, आजपासून बाजार समित्या सुरु होणार

पुणे : रिंग रोडसाठी आतापर्यंत 450 कोटींचे वाटप

Back to top button