पिंपरी-चिंचवडमध्ये स्कूलबस चालकांकडून नियमांना ‘ठेंगा’ | पुढारी

पिंपरी-चिंचवडमध्ये स्कूलबस चालकांकडून नियमांना ‘ठेंगा’

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्कूल बसचालक सर्रासपणे नियमांना बगल देत आहेत. त्यांच्याकडून स्कूल बससाठी निश्चित केलेल्या नियमावलीचे वारंवार उल्लंघन होत असल्याची बाब उजेडात आली आहे. दरम्यान, याबाबत वेळोवेळी तपासणी करून अशा स्कूल बसचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे आरटीओ प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोणत्या बाबींची पूर्तता हवी?

स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे.

वैध कंत्राट गरजेचे

शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी त्या वाहनांकडे मोटार वाहन अधिनियमाच्या कलम 74 अंतर्गत वैध कंत्राट असणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाच्या मालकीची आणि केवळ स्कूलबस म्हणूनच वापरण्यात येणारी वाहने त्यांच्या सुरुवातीच्या दिनांकापासून वीस वर्षांपेक्षा अधिक जुनी असता कामा नये.

नियमावलीनुसारच व्हावी विद्यार्थी वाहतूक

स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची तसेच शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करून त्यानंतरच वाहनमालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्यक आहे. तसेच, एका स्कूल बसमध्ये किती विद्यार्थी बसवावेत, याबाबतदेखील शासकीय नियमावली जाहीर केली आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्यार्थी व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बसच्या नियमावलीचा अवलंब गरजेचा आहे.

स्कूल बसमध्ये काय सुविधा हव्या?

  • बसमध्ये असलेल्या संचामध्ये सर्व प्रथमोपचार साहित्य आणि औषधे उपलब्ध असणे गरजेचे आहे.
  • प्रमाण संस्थेने प्रमाणित केलेली 5 किलोग्रॅम वजनाची एबीसी प्रमाणातील दोन अग्निशमन यंत्रे बसविणे गरजेचे आहे. त्यातील एक चालक कक्षात आणि दुसरे संकटसमयी बाहेर पडावयाच्या मार्गाजवळ बसविणे गरजेचे आहे.
  • बसच्या खिडक्यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर 5 से.मी. पेक्षा अधिक असू नये.
  • मुलांच्या बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी बसमध्ये स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे.
  • बसची सर्व आसने समोरील बाजू असावीत. जेणेकरून त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होता कामा नये.
  • तसेच, शालेय बसवर कोणत्याही प्रकारची व्यावसायिक जाहिरात असू नये.

हेही वाचा

मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकनी दिसते : डॉ. विजयकुमार गावित

परवडत नसेल तर दोन-चार महिने कांदा खाऊ नका : दादा भुसे यांचे वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगरमधील 500 गावांवर पावसाची खप्पामर्जी; आजपासून पिकांची पाहणी

Back to top button