गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या : आमदार अश्विनी जगताप | पुढारी

गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या : आमदार अश्विनी जगताप

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव हा सर्वांना आनंद देणारा उत्सव आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाजाच्या भिंती उभ्या न करता पारंपरिक व भारतीय संस्कृतीला पोषक अशा प्रकारची वाद्ये मिरवणुकीत वापरली पाहिजेत, असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने आयोजित गणेशोत्सव स्पर्धा पारितोषिक समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, संतोष ढोरे, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाल्या की, देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनी आणि मुलींना सुरक्षित वाटेल अशा प्रकारची व्यवस्था मंडळांनी केली पाहिजे. अनेक मंडळे सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवत असतात. या उपक्रमातूनच समाजाला एक दिशा मिळत असते. कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही गोष्टींचे पालन करून आपण सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदारांच्या हस्ते शहरातील विजेत्या मंडळांना भरघोस बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये थेरगाव येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने गणेशोत्सव स्पर्धेत शहरात प्रथम क्रमांक पटकावला. मंडळाचे आधारस्तंभ कांतीलाल गुजर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की, कार्यकर्ते निर्माण होण्याचे व्यासपीठ म्हणजे गणेश मंडळे होत. या गणेश मंडळातूनच उद्याच्या जगाचे नेतृत्व, कर्तृत्व आकाराला येत असते. तसेच गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, पठारे लांडगे लिंबाची तालीम मंडळ, एस के एफ मित्र मंडळ, अशा सहा मंडळांना जय गणेश पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत रासने यांनी प्रास्ताविक केले.

Back to top button