पुणे महापालिकेकडे बांधकामे नियमितीकरणासाठी 856 प्रस्ताव | पुढारी

पुणे महापालिकेकडे बांधकामे नियमितीकरणासाठी 856 प्रस्ताव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अवैध गुंठेवारीतील बांधकामे अधिकृत करण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये महापालिकेकडे केवळ 856 प्रस्ताव दाखल झाले असून त्यातील 20 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, गुंठेवारी नियमित करण्यासाठी येणारा मोठा खर्च, किचकट नियमावली आणि क्षमतेपेक्षा जास्त बांधकामे यामुळे याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी शक्य ती बांधकामे गुंठेवारी कायद्यानुसार अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत आहे. त्यानंतर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

यासाठी सुधारित विकास शुल्क निश्चित केले आहे. महापालिकेने ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करायचा निर्णय घेतल्याने त्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वेळ लागला. अखेर 10 जानेवारी 2022 पासून शहरातील गुंठेवारीतील अवैध बांधकामे अधिकृत करून घेण्यासाठी प्रस्ताव घेण्यास सुरवात केली. याला नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रस्ताव सादर करण्यास महापालिकेने मुदतवाढ दिली. दुसर्‍यावेळी दिलेली मुदतवाढ 31 जुलैला संपली. या मुदतीमध्ये बांधकाम विभागाकडे 856 प्रस्ताव आले आहेत. त्यातील 20 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 289 प्रस्तावाची नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. बांधकाम नियमित करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क नागरिकांच्या खिशाला परवडणारे नाही. यासह वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक प्रस्ताव दाखल करण्याबाबत उत्सुक नसल्याचे दिसते.

हेही वाचा :

शरद पवार भाजपसोबत गेले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रिपद

सुप्रिया सुळेंपाठोपाठ अजित पवारांनीही घेतली नवाब मलिक यांची भेट

Back to top button