मुंबई : पुढारी वृत्तसेवा शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल; अन्यथा त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोर ठेवली आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केला. अर्थात, शरद पवार आघाडीच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, शरद पवार यांना केंद्रात मंत्रिपद किंवा नीती आयोगाची ऑफर भाजपकडून असल्याचा तसेच शरद पवार-अजित पवार भेटीत त्यावर चर्चा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत केल्याचे वृत्त असून, शरद पवार यांनी बुधवारी त्याचा इन्कार केला.
अजित पवार यांचे कथित बंड आणि त्यानंतर महिनाभरापासून पवार काका-पुतण्यामध्ये सुरू असलेल्या काही छुप्या, तर काही उघड गाठीभेटींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत काय बोलणे झाले, हे अधिकृतपणे कळण्याचा मार्ग नसल्याने या भेटींचे अनेक अर्थ आणि अंदाज लावले जात आहेत.
शरद पवारांना अशी ऑफर असल्याचा दावा सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. आता विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी नवा दावा करून नव्या चर्चेला तोंड फोडले. शरद पवार व अजित पवार भेटीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर
वडेट्टीवार म्हणाले, या भेटीमुळे संभ्रम झाला, असे म्हणण्याचे काही कारण नाही. ते काका-पुतणे आहेत. त्यामुळे शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील, त्यासाठी सर्वांनी धीर धरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
काका-पुतण्याच्या या भेटीत कोणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो त्याची असते. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर शरद पवारांना बरोबर घ्यावेच लागेल; पण पवार त्यांच्यासोबत आले नाहीत, तर अजित पवारांना केवळ मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत राहावे लागेल, असे कदाचित भाजपने म्हटले असेल. म्हणूनच या भेटीगाठी म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खटाटोप आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी अजित पवारांना लगावला. अजित पवार भेटले म्हणून शरद पवार यांच्या मनात काही बदल होईल, अशी शक्यता वाटत नाही. आघाडीच्या विरोधात ते कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. 1 तारखेला 'इंडिया'च्या बैठकीत ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार हे शरद पवारांना भाजपसोबत येण्यासाठी गळ घालत असून, अद्याप त्यांना यश आलेले नाही. केंद्रात कृषिमंत्रिपद किंवा नीती आयोगाचे अध्यक्षपद, अशी ऑफर अजित पवारांनी आपल्या काकांसमोर ठेवली. मात्र, ती शरद पवारांनी धुडकावल्याचे वृत्त आता चर्चेत आहे.