लग्नाच्या आमिषाने बलात्कार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी | पुढारी

लग्नाच्या आमिषाने बलात्कार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेऊन बलात्कार करणार्‍याला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बाळासाहेब लक्ष्मण बांगर (वय 38, रा. बीड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित महिला कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते.

सन 2006 पासून बांगरने लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या लॉजवर नेत तिच्यावर बलात्कार केला. लग्नाला नकार देऊन उलट महिलेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी हा विवाहित होता. पीडितेला तसेच भावाला धमकावून मारहाण करू लागल्याने महिलेने 2013 मध्ये खेड पोलिसात बलात्कार, फसवणूक व धमकावून मारहाण केल्याबाबत तक्रार दिली. आरोपी खेड तालुक्यातील एका गावी नोकरी करत होता. आरोपीला अटक झाली. नंतर त्याला जामीन मिळाला. हा खटला दहा वर्षे राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता.

आरोपीने असे काही घडलेच नाही असा दावा केला. सरकारी वकील अ‍ॅड. शुभांगी देशमुख यांनी लॉजचे पुरावे सादर केले. वैद्यकीय अहवाल, पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्या. सय्यद यांनी आरोपीला सात वर्षे सक्तमजुरीची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले.

 हेही वाचा

दुर्दैवी ! बसच्या चाकाखाली सापडून महिला प्रवाशी जागीच ठार

सांगलीत आढळला पांढरा साप

कोल्हापूर : विद्युत क्षेत्रातील सुधारणा कागदावरच

Back to top button