मैत्रीदिनी तरुणाईने अनुभवला सेलिब्रेशन मूड | पुढारी

मैत्रीदिनी तरुणाईने अनुभवला सेलिब्रेशन मूड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तेरे जैसा यार कहाँ, असे म्हणत…फ्रेंडशीप बँड बांधून, मित्रांसोबत चहा-कॉफीची पार्टी करत तरुणाईने रविवारी मैत्रीदिन सेलिब्रेट केला. कॅम्प, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी मैत्रीदिनाचा सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला. मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांना शुभेच्छा देत तरुणांनी हा दिवस साजरा केला. कोणी शुभेच्छापत्र देऊन मित्रांविषयीच्या भावना व्यक्त केल्या, तर काहींनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर खास संदेश-छायाचित्रे पोस्ट करत मित्रांना शुभेच्छा दिल्या.

तरुणाईने मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवून महाविद्यालयीन कट्ट्यावर जुने दिवस आठवले. तर तरुणांसह ज्येष्ठांनीही सोशल मीडियाद्वारे मित्रांना शुभेच्छा दिल्या अन् आठवणींना उजाळा दिला. मैत्रीदिन रविवारी उत्साहात आणि आनंदात सेलिब्रेशन करण्यात आला. रविवार असल्याने अनेकांनी आपल्या मित्रांच्या ग्रुपसोबत हा दिवस साजरा केला. त्यामुळेच फर्ग्युसन महालिद्यालय रस्ता असो वा कॅम्पमधील महात्मा गांधी रस्ता…येथे सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाले. अनेक जण कॅफे आणि मॉलमध्ये जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवताना पाहायला मिळाले. तर काहींनी सायंकाळी रेस्टॉरंटमध्ये जाऊन मित्रांसोबत पार्टीचा आनंद लुटला. तर काहींनी मित्रांबरोबर शॉपिंगचेही निमित्त साधले.

मित्रांना फ्रेंडशीप बँड बांधत, भेटवस्तू देऊन अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मैत्रीदिनाच्या निमित्ताने यंदा तरुणाईने मित्रांबरोबर फिरायला जाण्याचे नियोजनही केले होते. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवला. तसेच, चहाचा घोट घेत जुन्या आठवणींना उजाळाही दिला. सायंकाळनंतरही फर्ग्युसन महालिद्यालय रस्ता, डेक्कन परिसर, कॅम्प परिसर, जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर येथे तरुण-तरुणींचे मैत्रीदिन सेलिब्रेशन पाहायला मिळाले. यानिमित्ताने काही संस्था-संघटनांनी सामाजिक उपक्रमही राबविले.

मैत्रीदिनानिमित्त काहींनी आपल्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटर आणि व्हॉटस्अ‍ॅपद्वारेही शुभेच्छा दिल्या. काहींनी आपल्या मित्रांच्या ग्रुपसोबतचे छायाचित्र शेअर करत संदेशाद्वारे आठवणींना उजाळा दिला. तर काहींनी व्हिडिओ पोस्ट करत आयुष्यातील मित्रांचे महत्त्व बोलके केले. तर काहींनी मैत्रीदिनाचे खास पोस्टर पाठवून मित्रांना शुभेच्छा दिल्या. दुरावलेल्या मित्रांनाही संदेश पाठवून अनेकांनी शुभेच्छा देत मैत्रीचा नवा बंध जोडला.

हेही वाचा

राज्यातील मोफत आरोग्यसेवेचा गरजूंना होणार लाभ

वेल्हे : गिवशी येथे पावसामुळे दरड कोसळली

Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भुकंपाचे धक्के

Back to top button