राज्यातील मोफत आरोग्यसेवेचा गरजूंना होणार लाभ | पुढारी

राज्यातील मोफत आरोग्यसेवेचा गरजूंना होणार लाभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘राज्य सरकारने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. राज्य सरकार, सोमेश्वर फाउंडेशन आणि निरामय फाउंडेशनच्या वतीने (मुंबई) कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जन्मदिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आदी या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असताना उपचाराला बर्‍याचदा मर्यादा येतात. अशावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा घडते. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी जात, धर्मपलीकडे नेहमी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले’ भुजबळ म्हणाले, ‘महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा मिळणार असून, विविध व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे.’

वडेट्टीवार म्हणाले, ‘माणसात आणि सेवेत देव आहे, असे समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचा गरजू नागरिकांना लाभ होईल.’ शिरोळे, निरामय फाउंडेशनचे रामेश्वर नाईक, सनी निम्हण यांनीही या वेळी विचार व्यक्त केले. पवार यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मंत्री महाजन यांनीदेखील शिबिराला भेट दिली.

शस्त्रक्रियेची करणार मोफत व्यवस्था

महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. तपासणीनंतर मोफत औषध देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तपासणीनंतर आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा

Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भुकंपाचे धक्के

वेल्हे : गिवशी येथे पावसामुळे दरड कोसळली

इथेनॉल प्रकल्प राबवा, हवी तेवढी मदत देऊ; अमित शहा यांची ग्वाही

Back to top button