वेल्हे : गिवशी येथे पावसामुळे दरड कोसळली | पुढारी

वेल्हे : गिवशी येथे पावसामुळे दरड कोसळली

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील पानशेत धरण खोर्‍यातील पानशेत-पोळे रस्त्यावर गिवशी येथे शनिवारी (दि. 5) दुपारी डोंगरकड्याची दरड कोसळली. संततधारेमुळे उन्मळलेल्या झाडा-झुडपांसह दरडीचा राडारोडा रस्त्यावर खाली वाहून आला आहे. जोरदार पावसात मोठी दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पानशेत-पोळे रस्त्याने पानशेत धरण भागातील माणगाव, पोळे, घोडशेत आदी 20 गावांचे दळणवळण आहे. सुट्यांच्या दिवशी शिरकोली येथे श्रीशिरकाई देवीच्या दर्शनासाठी भाविक तसेच पावसाळ्यात वर्षाविहारानिमित्त या परिसरातील हॉटेलमध्ये पर्यटक गर्दी करत आहेत.
मात्र, या रस्त्यावरील गिवशी येथे दरडी कोसळत असल्याने दुर्घटनांची टांगती तलवार उभी राहिली आहे. शनिवारी (दि. 5) दुपारी 2 च्या सुमारास डोंगराची 50 ते 60 फूट रुंदीची दरड खाली कोसळली. यामध्ये झाडे-झुडपे जमीनदोस्त झाली. सुदैवाने यामध्ये कोणती हानी झाली नाही. मात्र, दरडीमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

गेल्या वर्षीही डोंगराच्या पुढील बाजूची दरड कोसळली होती. सध्या ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तीव्र उतार असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सुरक्षित प्रवासासाठी तातडीने दरड प्रणव क्षेत्रात उपाययोजना कराव्यात तसेच धोकादायक दरडी हटविण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी
केली आहे.

पानशेत-पोळे रस्त्यावर ठिकठिकाणी डोंगर तोडल्याने कड्याच्या दरडी कोसळत आहेत. गिवशी येथे दोन वर्षांपासून दरडीचा धोका आहे. रस्त्याखाली गाव आहे. त्यामुळे दरड कोसळून येथील वाहतूक बंद पडणार आहे. तसेच गावातील रहिवाशांना धोका आहे.

अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली.

हेही वाचा

परभणी: सेलू रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून साईबाबांच्या गुरूंची ओळख जगापुढे येईल: आमदार मेघना बोर्डीकर

स्‍व. डिडोळकर स्‍मृती ऑडिटोरियमाठी १५० कोटी : नितीन गडकरी

कात्रज टेकडीलगत बेकायदा मिनी इंडस्ट्री

Back to top button