पुणे : खासगी वाहन चालकांसाठी आता ‘सिबिल’ | पुढारी

पुणे : खासगी वाहन चालकांसाठी आता 'सिबिल'

प्रसाद जगताप

पुणे : बँकेचे कर्ज देण्यापूर्वी बँक प्रशासन अर्जदाराचा सिबिल स्कोअर चेक करते. त्यात त्याची संपूर्ण कुंडलीच बँकेला समजते. सिबिल चांगला असेल तर कमीतकमी व्याज दराने कर्ज दिले जाते. याचप्रमाणे आता खासगी बसचालकाला कामावर ठेवण्यापूर्वी  त्याच्या सवयी, वर्तन कसे आहे, हे तपासले जाणार आहे. थोडक्यात, त्याचा वाहन चालविण्याचा सिबिल स्कोअर चांगला असेल, तरच त्याला गाडी चालवण्यासाठी कामावर ठेवले जाणार आहे. या यंत्रणेमुळे राज्यात होणारे खासगी बसचे अपघात टळणार आहेत.
दिवसेंदिवस खासगी बसच्या अपघातात वाढ होत आहे. त्यात अनेकांचा निष्कारण बळी जात आहेत. या घटनांमध्ये अनेकदा चालकांच्याच चुका असल्याचे समोर आले आहे. अतिवेगाने, दारू पिऊन गाडी चालवणे यांसारख्या चालकांच्या चुका समोर येत असतात. त्या रोखण्यासाठी पुणे बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने एका संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे.
या संकेतस्थळावर चालकाचा लायसन्स नंबर टाकल्यावर त्याची कुंडलीच खासगी बसमालकांच्या हाती लागणार आहे, त्यामुळे खासगी बसगाड्यांचे होणारे अपघात रोखण्यास काही प्रमाणात का होईना मदत होणार आहे. असोसिएशनच्या वतीने हे संकेतस्थळ प्रादेशिक परिवहन कार्यालये, सारथी, परिवहन या शासकीय संकेतस्थळांना जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे
आगामी काळात चालकांच्या बेशिस्तपणावर सरकारी यंत्रणांचेसुध्दा लक्ष राहणार आहे.

असे असेल संकेतस्थळ?

  • चालकांची माहिती संकलित केली जाणार आहे.
  • चालकाच्या चांगल्या-वाईट सवयी, वर्तणुकीची माहिती
  • वाहतूक नियमभंगाची नोंद
  • गुन्हा नोंद आहे की नाही, याची माहिती
  • आतापर्यंत किती अपघात झाले, याची माहिती असेल
  • किती तास बस चालवतो. 8 तासांपेक्षा अधिक किंवा कमी, याबाबत माहिती समजेल
  • आतापर्यंत किती किलोमीटर गाडी चालविली
  • संपूर्ण वैयक्तिक माहिती
चालकाने केलेल्या चुकीची शिक्षा नेहमी बसमालकांना मिळते. कोणताही बसमालक चालकाला वाहतुकीचे नियम पाळू नकोस, असे सांगत नाही. मात्र, चालक मार्गावर असताना गाडी अतिवेगाने पळवतात, दारू पितात, रस्त्यामध्ये अवैधरीत्या टप्पा वाहतूक करतात. परिणामी, या वेळी होणार्‍या अपघाताचे खापर बसमालकांवरच फुटते, त्यामुळे आम्ही हे संकेतस्थळ तयार करत असून, या संकेतस्थळामुळे चालकांना शिस्त लागून जरब नक्कीच बसणार आहे. तसेच, आमच्या गाड्यांचे वाढते अपघात रोखण्यास मदत होणार आहे.
– किरण देसाई, कार्याध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन

चालकाला रेटिंग स्टार मिळणार…

एखादी गोष्ट आवडली की, त्याबाबत वापरकर्त्याला ऑनलाईन ‘रेटिंग स्टार’ देण्याची सुविधा असते. असेच ’रेटिंग स्टार’ या संकेतस्थळावर चालकांनासुध्दा देता येणार आहेत. त्यामुळे चालकांच्या कामाबाबतची विश्वासार्हता खासगी बसमालकांना मिळणार असून, चांगल्या प्रकारे बस सेवा पुरविण्यास हातभार लागणार आहे.
हेही वाचा

Back to top button