नागपूर : सव्वा कोटी लुटणारे दोन आरोपी गजाआड | पुढारी

नागपूर : सव्वा कोटी लुटणारे दोन आरोपी गजाआड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या लकडगंज ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या नेहरू पुतळ्याजवळ मंगळवारी सुमारे सव्वा कोटी रुपयांची रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती. यातील दोन आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांनी पुण्यात अटक करून नागपुरात आणले आहे. दीपक जाट आणि नेमावर अशी या राजस्थानमधील दोन आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यावसायिकाचे पैसे लुटले त्याच विरमभाई पटेल यांच्याकडे हे कधीकाळी कामाला होते. पुण्याला विमानाने गेलेले हे दोघे तिथून जयपूरला जाण्याच्या प्रयत्नात होते. ही रक्कम त्यानी दुसऱ्याकडे दिल्याचे कळते. त्यामुळे आता त्यांच्या सहकाऱ्यांचा मागोवा पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

विविध पथके या आरोपींच्या शोधात रवाना झाली आहेत. प्रथमदर्शनी या घटनेत २ आरोपींनी संशयास्पदरित्या माऊझरचा धाक दाखवून ही रोकड लुटली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. याच फुटेजने या आरोपीस अटक करता आली. लकडगंज येथील व्यापारी विरम पटेल यांनी त्यांचे दुकान नेहमीप्रमाणे रात्री साडे आठच्या सुमारास बंद केले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सव्वा कोटी रुपयांची रोकड असलेली बॅग दिली. ही बॅग कर्मचाऱ्यांनी दुचाकी ऍक्टिवाच्या डिक्कीत ठेऊन ते तिथून निघून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजनुसार पटेल यांच्या दुकानापासून थोड्याच अंतरावर तोंडावर मास्क न घातलेले दोन युवक जणू या गाडीची वाटच बघत होते. सीसीटीव्ही फुटेज पाहता पोलिसांचा संशय प्राथमिक दृष्ट्या  दुकानातील कर्मचाऱ्यांवरच वाढला आहे कारण हा एकंदर घटनाक्रमच विचित्र आहे. आरोपी लूटमार करण्यासाठी पायी चालत आले त्यांनी तोंडावर कुठलाही मास्क घातला नाही आणि कर्मचाऱ्यांना काहीही इजा न करता सर्वांच्या देखत रोकड ताब्यात घेत त्यांचीच दुचाकी घेऊन आरोपी पसार झाले.

हेही वाचलंत का?

Back to top button