ड्रोनच्या भीतीने डाळिंब, टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांची झोप उडाली | पुढारी

ड्रोनच्या भीतीने डाळिंब, टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांची झोप उडाली

राजेंद्र कवडे-देशमुख

बावडा : सध्या डाळिंब व टोमॅटोला विक्रमी भाव मिळत आहे. रात्री फिरणार्‍या ड्रोनसदृश उपकरणाद्वारे आपल्या डाळिंब व टोमॅटो पिकाचा सर्व्हे करून चोरी होण्याच्या भीतीने डाळिंब व टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या रात्र जागून काढत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यातील टणू, गिरवी, पिपरी बु. आदी गावांमध्ये पाहावयास मिळत आहे.

गेली दहा-बारा दिवसांपासून रात्री चक्क ड्रोन फिरत असल्याचा बोलबाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी अशा फिरणार्‍या ड्रोनचे व्हिडिओ काढले आहेत. मात्र व्हिडीओमध्ये आकाशात ड्रोन स्पष्टपणे दिसत नसून लखलखणारे उपकरण दिसत आहे. मात्र, त्याला ड्रोन समजून शेतकर्‍यांनी भीती घेतल्याचे दिसून येत आहे. बावडानजीक टणू परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवारी रात्री ड्रोनसदृश उपकरण आकाशात फिरताना पहिल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांनी मोठा खर्च करून व कष्टाने डाळिंब व टोमॅटोचे चांगले पीक जोमदार आणले आहे. या पिकातून लाखोंचे उत्पादन निघणार, असे स्पष्ट दिसत आहे. जर ड्रोनद्वारे सर्व्हे करून रात्री चोरी झाली तर काय? अशी भीती शेतकर्‍यांच्या डोक्यात बसल्याने कुटुंबातील सदस्य आळीपाळीने रात्रभर जागरण करीत टोमॅटो, डाळिंब बागांची राखण करीत आहेत. जागरणामुळे शेतकरी मानसिक ताणतणावात दिसत आहेत. ड्रोनच्या कथित भीतीपोटी डाळिंब, टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकरी शरद जगदाळे पाटील (टणू) यांनी दिली.

नागरिक व प्रशासनात दावे-प्रतिदावे
रात्री कथित ड्रोन फिरवणार्‍या व्यक्ती कोण? त्यांचा उद्देश काय? याचा तपास करून शेतकर्‍यांच्या मनातील शंका शासनाने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे. गर्द काळोख्या रात्री ड्रोनच्या माध्यमातून डाळिंब, टोमॅटोबागेचे फोटो काढणे, सर्व्हे करणे अशक्य असल्याचे अनेकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. यामध्ये अफवाच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी ड्रोनसदृश चमकणार्‍या उपकरणाची भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, शासनाने याबाबत अधिकृतपणे खुलासा करून शेतकर्‍यांना विश्वासात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

येत्या 24 वर्षांत पुणे शहराची लोकसंख्या एक कोटीवर

पुणे महापालिकेकडून निधीची उधळपट्टी ! येरवड्यात पथदिव्यांचे सुस्थितीतील ब्रॅकेट बदलले

 

 

Back to top button