पुणे महापालिकेकडून निधीची उधळपट्टी ! येरवड्यात पथदिव्यांचे सुस्थितीतील ब्रॅकेट बदलले | पुढारी

पुणे महापालिकेकडून निधीची उधळपट्टी ! येरवड्यात पथदिव्यांचे सुस्थितीतील ब्रॅकेट बदलले

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर विमानतळापासून ते येरवड्यातील ठाकरे चौकादरम्याच्या रस्त्यावरील पथदिव्यांचे सुस्थितीत असलेले ब्रॅकेट बदलण्यात आले आहेत. यामुळे लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी हे ब्रॅकेट बदलले तर जात नाहीत ना, असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात जी 20 परिषदेच्या अनुषंगाने विविध विकासकामे केली जात आहेत. विद्युत विभागानेदेखील विमानतळापासून ते संगमवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबांवर दुसर्‍या जी 20 परिषदेच्या वेळी दिवे बसविले होते. असे असताना या खांबांवरील दोन्ही बाजूला बसविलेले ब्रॅकेट सध्या बदलले जात आहेत. डॉ. आंबेडकर चौक ते ठाकरे चौकापर्यंतचे ब्रॅकेट काढण्यात आले आहेत. हे ब्रॅकेट नुकतेच बसविले असल्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मात्र, केवळ एकसारखी डिझाइन दिसण्यासाठी हेब्रॅकेट बदलले जात आहेत.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता राजेंद्र वाघ यांनी याबाबत सांगितले की, डॉ. आंबेडकर चौक ते ठाकरे चौकापर्यंतच्या कामासाठी सुमारे दहा लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर आर्किटेकनी ठरवून दिलेल्या डिझाइननुसार ब्रॅकेट असावेत, यासाठी ते बदलण्यात येत आहेत. या अंतर्गत नागपूर चाळपासून ते ठाकरे चौकापर्यंतचे 139 पथ दिव्यांवरील ब्रॅकेट बदलले आहेत.

महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये अद्याप पथदिवे नाहीत. यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, जी 20 परिषदेच्या नावाखाली विद्युत विभागामार्फत उधळपट्टी सुरू आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या या कामाच्या निविदांची चौकशी करावी यावी.

                                                      – शशी साटोटे, सामाजिक कार्यकर्ते

या पथदिव्यांवरील ब्रॅकेट जरी चांगले असले, तरी त्यांची डिझाइन एक सारखी नाही. वास्तुविषारदांच्या सूचनेनुसार ते बदलले असून, त्या ठिकाणी नवे ब्रॅकेट टाकण्यात आले आहेत. जुने ब्रॅकेट दुसर्‍या ठिकाणी वापरले जाणार आहेत.

                                                                -श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंत

 

Back to top button