

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्याचा जननदर आणि स्थलांतरणाचा वेग पाहता 2047 पर्यंत शहराची लोकसंख्या 1 कोटीच्या घरामध्ये पोहोचेल, असा अंदाज महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाणीपुरवठ्याचे नवीन पर्याय न शोधल्यास निम्म्या पुणेकरांसमोर पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये शहरातील वापरातील जमीन, लोकसंख्या, रस्ते व वाहनांचे प्रमाण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, उद्याने, हवामान, पर्यावरणाची सद्य:स्थिती, महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या योजना आणि भविष्यातील योजना, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या आकडेवारीवरून भविष्यातील पुणे शहराचे चित्र दिसत आहे.
महापालिका हद्दीमध्ये 23 गावे समाविष्ट झाल्यानंतर क्षेत्रफळ 519 चौ. कि. मी. झाले आहे. समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू असून, तेथेही एकात्मिक विकास नियमावली लागू झाली आहे. रोजगारानिमित्त स्थलांतरितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालाही चांगले दिवस आले आहेत. भौगोलिक स्थितीमुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनात अडथळे येत आहेत. सुमारे 10 टक्के लोकसंख्येला पाण्याची चणचण भासते. भविष्यात उपनगरे आणि समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा :