पुणे : शासकीय रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांचा अभाव | पुढारी

पुणे : शासकीय रुग्णालयांत आयव्हीएफ उपचारांचा अभाव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वंध्यत्वाची समस्या असणार्‍या जोडप्यांसाठी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन अर्थात आयव्हीएफ उपचारपद्धती वरदान ठरत आहे. मात्र, प्रगत म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्रातील एकाही सरकारी रुग्णालयात आयव्हीएफ उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालक होण्याचे स्वप्न पाहणार्‍या; परंतु आर्थिक क्षमता नसलेल्या जोडप्यांना यापासून वंचित राहावे लागत आहे.

सध्या मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो शहरांमधील मोठ्या रुग्णालयांमध्येही सरकारी आयव्हीएफ केंद्र नाही. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल आणि कामा रुग्णालयामध्ये आयव्हीएफ सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

आयव्हीएफ उपचारपद्धतीचा खर्च सध्या तरी लाखांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच आर्थिक स्तरांमधील जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये हे उपचार महाग असतात आणि गरीब जोडप्यांना ते परवडत नाहीत. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.

वंध्यत्वाचे प्रमाण का वाढतेय?
संकरित धान्य, आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, मद्यपान, धूम—पान, लठ्ठपणा आणि इतर कारणांमुळे वंध्यत्वाचा त्रास होतो. वय वाढल्यावर होणारे विवाह हेही यामागील प्रमुख कारण ठरत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एक वर्षापेक्षा जास्त काळ गर्भनिरोधकांशिवाय नियमित लैंगिक संबंध ठेवूनही नैसर्गिकरित्या मूल होत नसलेल्या जोडप्यांना वंध्यत्व मानले जाते. अशा जोडप्यांसाठी आयव्हीएफ हा आशेचा किरण आहे. तथापि, खर्च लाखोंमध्ये असल्याने, आर्थिकदृष्ट्या अनेक जोडप्यांना हा पर्याय अवलंबता येत नाही.

काय आहे आयव्हीएफ उपचार?

पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या अथवा स्त्रियांमधील बीजांडांची संख्या कमी झाल्यास वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी आयव्हीएफ उपचारपद्धतीच्या मदतीने गर्भधारणा यशस्वी होऊ शकते. आयव्हीएफ उपचारपद्धतीत शुक्रजंतूच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते. उपचार सुरू केल्यापासून सुमारे 85 टक्के जोडप्यांना एका वर्षामध्ये गर्भधारणा होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आयव्हीएफ सेंटरमुळे अनेक जोडप्यांचे पालक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता,
ससून सर्वोपचार रुग्णालय

हेही वाचा

चिनी कंपनीचा वाहननिर्मितीचा प्रकल्प फेटाळला

पुणे : विकसकाला ग्राहक तक्रार आयोगाचा दणका; ३ महिन्यांत सदनिकेचा ताबा देण्याचा आदेश

पुणे मेट्रोची दुसर्‍या टप्प्यातील स्थानके तयार

Back to top button