MadanDas Devi Passes Away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांचे निधन | पुढारी

MadanDas Devi Passes Away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांचे निधन

आशिष देशमुख

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह मदनदास देवी (वय 81) यांचे सोमवारी सकाळी बंगरुळू येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणले जाईल. मंगळवारी सकाळी 9 ते 11 पर्यंत मोतीबाग येथील संघ कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी 11.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

मदनदास यांचा जन्म 9 जुलै रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेच्या दिवशीच झाला. ते अभाविपचे सहकार्यवाह देखिल होते. त्यांचे मूळगाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. शालेय शिक्षणानंतर त्यांनी 1959 मध्ये पुणे येथील बी.एम.सी.सी महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी आयएलएस लॉ कॉलेज मधून सुवर्ण पदकासह विधी पदवी संपादन केली. पुण्यात शिक्षण घेत असताना वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघात दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, तत्कालीन संघाचे पदाधिकारी प्रल्हादजी अभ्यंकर व अन्य अधिकारी वर्ग यांच्या संपर्कात आले.

त्यानंतर त्यांनी संघ कार्यास समर्पित जीवनास सुरुवात केली. 1969 पासून संघ प्रचारक म्हणून काम केले. 1975 पासून अभाविपची जबाबदारी देण्यात आली. अभाविपत विभाग, प्रदेश, क्षेत्रीय या जबाबदारी नंतर अ.भा. संघटन मंत्री.पूर्ण देशभरात तालुका, महाविद्यालय, शहर स्तरावर काम करीत अभाविपला अखिल भारतीय स्तरावर नेण्यात मोठी भूमिका निभावली. सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली.

आज पुण्यात अंत्यसंस्कार

मदनदासदेवी यांचे पार्थिव सोमवारी रात्रीपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पार्थिव मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहणार आहे..

हेही वाचा

खेड : लम्पी लसीकरणास टाळाटाळ

पाथर्डी : चार वर्षांनंतर वसाव कुटुंबात ‘अमन’

Back to top button