पाथर्डी : चार वर्षांनंतर वसाव कुटुंबात ‘अमन’ | पुढारी

पाथर्डी : चार वर्षांनंतर वसाव कुटुंबात ‘अमन’

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सुरत येथून हरविलेला अमन ऊर्फ रोनित भैरवसिंग वसावा या मुलाच्या कुटुंबाचा शोध घेऊन सुपूर्त करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या पाथर्डी येथील गतिमंद मुलांच्या बालगृहातील शिक्षकांनी ‘अमन’च्या पालकांना शोधण्यात यश आले आहे.

समाज कल्याणचे जिल्हा अधिकारी राधाकिसन देवढे यांनी याबद्दल बालगृहाचे कौतुक केले. नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठाण व सांस्कृतिक मंडळ संचलित गतिमंद मुलांचे बालगृह अनाथ, बेवारस गतिमंदांसाठी काम करते. बालगृहांत 69 अनाथ, बेवारस गतिमंद बालके आहेत. या बालकांपैकी अमन ऊर्फ रोनितसिंग वसावा (वय 25) हा जालन्यातून 26 फेब्रुवारी 2021 रोजी काळजी व संरक्षणाची गरज असल्याने बालगृहात दाखल करण्यात आला होता.

‘अमन’ला पुन्हा चार वर्षानंतर कुटुंंब मिळाले असून, तो कुटुंबात पुन्हा पोहोचला आहे. याचा आनंद बालगृहातील शिक्षकांना आहे. अमन ऊर्फ रोनितचे आई-वडिल मयत असून, त्याचा सांभाळ त्याचा भाऊ सुरेश भैरवसिंग वसावा करत आहे. तो गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे, अधीक्षक संभाजी झावरे, विशेष शिक्षक नितेश मेघनर व सहकार्‍यांनी प्रयत्न केले. यावेळी साज कल्याण अधिकारी कार्यालयातील दिनकर नाठे, बालगृहाचे मुख्याध्यापक सचिन तरवडे उपस्थित होते.

आधार कार्डवरून मिळाला घरचा पत्ता

‘अमन’चे कोणतेही कागदपत्रे नसल्याने, नवीन आधारकार्ड काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. परंतु, यापूर्वीच त्याच्या आधारकार्डची नोंदणी असल्याने नव्याने आधारकार्ड मिळत नव्हते. आधारकार्डच्या संकेतस्थळावर याबाबतची तक्रार करण्यात आली. यांनतर 3 जुलै 2023 रोजी ‘अमन’चे आधारकार्ड मिळाले आणि अमन वसावाच्या घरचा पत्ता मिळाला. यावरून जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगृहाच्या शिक्षकांनी त्याचा पत्ता शोधून भाऊ सुरेश भैरवसिंग वसावा यांच्याकडे ‘अमन’ला सुपूर्द केले.

हेही वाचा

कोल्हापूर: नागांव येथे जुगार अड्ड्यांवर छापा; २१ जणांवर अटक

करंजी : महिला सरपंचासह कुटुंबाला मारहाण

पाथर्डी : दारू अड्ड्यांवर जाऊन दिल्या नोटिसा; सरपंच आठरे यांचा पुढाकार

Back to top button