पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 100 घरे धोकादायक; बोर्डाने रहिवाशांना बजावली नोटीस | पुढारी

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 100 घरे धोकादायक; बोर्डाने रहिवाशांना बजावली नोटीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संततधार पावसामुळे जुन्या आणि धोकादायक घरांची पडझड होऊन जीवित आणि वित्तहानी होत असते. हे टाळण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने सर्व्हेक्षण केले आहे. त्यात 100 घरे धोकादायक असल्याची माहिती समोर आली. यातील ज्या घरांना किरकोळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्यांना दुरुस्तीची परवानगी देण्यात आली. मात्र, ज्यांना जुने घर पाडून नव्याने बांधायचे आहे, त्यांना रितसर अर्ज करून बांधकाम परवानगी घ्यावी लागणार आहे.

कॅन्टोन्मेंट क्षेत्रात बांधकामांवर निर्बंध असून, नवीन बांधकामासाठी वाढीव एफएसआय मिळत नाही. सध्या आहे, तेवढेच बांधकाम करता येते, तर दुसरीकडे घर मालक आणि भाडेकरू असा वाद असल्यामुळे अनेक घरे मोडकळीस आली आहेत. घराचे छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधील धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने केलेल्या पाहणीत 100 घरे धोकादायक असल्याची माहिती समोर आली. घर खाली केल्यानंतर आपले हक्क जाईल, या भीतीने अनेक भाडेकरू धोकादायक घरात राहत आहेत. घर मालकांना आणि भाडेकरू यांना बोलावून दुरुस्ती करून घ्या किंवा घरात कोणीही राहू नका, अशा सूचना केल्या जात आहेत.

पावसाळापूर्व कामे करण्यात आली असून, घोरपडी परिसरात साफसफाई करण्यात आली. घरमालक आणि भाडेकरू यांच्यामधील वादांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, त्यांंच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रयत्न करत आहे. 100 घरे धोकादायक असून, 16 घरांना किरकोळ दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण दुरुस्ती करायची असेल तर आराखडा सादर करावा लागणार आहे.

– सुब्रत पाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट.

हेही वाचा

पुणे : पक्ष फुटीमुळे जि.प. गटांमध्ये राजकीय गुंता

IND vs WI : भारताची आघाडी तीनशेपार

Back to top button