IND vs WI : भारताची आघाडी तीनशेपार

IND vs WI : भारताची आघाडी तीनशेपार

पोर्ट ऑफ स्पेन, वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज कर्णधाराने झुंज देत संघाला फायटिंग पोझिशनमध्ये आणून ठेवले होते; परंतु चौथ्या दिवशी सकाळी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी उर्वरित डाव 255 धावांत गुंडाळल्याने भारताला पहिल्या डावात 183 धावांची आघाडी मिळाली.

यानंतर भारताने दुसर्‍या डावात 2 बाद 118 धावा केल्या होत्या. भारताच्या दुसर्‍या डावातील 15 व्या षटकात आलेल्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. भारताकडे एकूण 301 धावांची आघाडी झाली आहे.

भारताचा पहिला डाव 438 धावांत संपल्यानंतर वेस्ट इंडिजने आपल्या डावाची दमदार सुरुवात केली. त्यांनी तिसर्‍या दिवसअखेरीस 5 बाद 229 धावा केल्या होत्या; परंतु भारताने दुसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी कमाल केली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्यावेळी भारताचा पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने 37 धावांवर खेळणार्‍या अथान्झेला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने होल्डरला 15 धावांवर बाद करत विंडीजची अवस्था 7 बाद 223 धावा अशी केली. मोहम्मद सिराजने उरलेल्या चार विंडीज फलंदाजांना एका पाठोपाठ एक माघारी धाडले. अवघ्या 26 धावांत विंडीजचे उरलेले पाच फलंदाज बाद करत त्यांचा पहिला डाव 255 धावांत गुंडाळला. भारताकडे आता पहिल्या डावात 183 धावांची आघाडी आहे. मोहम्मद सिराजने 60 धावा देत विंडीजचा निम्मा संघ गारद केला.

त्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताचा दुसरा डाव सुरु केला. यात रोहित जास्त आक्रमक होता, त्याने केवळ 35 चेंडूतच जलद अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. गॅब्रीएलच्या गोलंदाजीवर जोसेफ अल्झारीने त्याचा फाईन लेगवर झेल घेतला. रोहितने 44 चेंडूंत 57 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या मालिकेतील त्याने सलग तिसर्‍यांदा पन्नासहून अधिक धावांची खेळी केली. (IND vs WI)

यानंतर शुभमन गिल खेळायला आला, पण त्याने एक चेंडू खेळल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पंचांनी या वाया जाणार्‍या वेळेतच लंचब्रेक घोषित केला. यावेळी भारताच्या 1 बाद 98 धावा झाल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 37 धावांवर खेळत होता. यावेळी भारताकडे एकूण 282 धावांची आघाडी होती.

जवळपास एक तासाचा खोडा घातल्यानंतर पाऊस थांबला. त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. वारीकॅनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक डा सिल्व्हाने त्याचा झेल घेतला. यशस्वीने 38 धावा केल्या.

पण काही काळानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. भारताच्या यावेळी 2 बाद 118 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 10 तर इशान किशन 8 धावांवर खेळत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news