लोणावळ्यातील रस्ते गेले खड्ड्यात ; प्रवास करताना नागरिकांचे होणारे हाल | पुढारी

लोणावळ्यातील रस्ते गेले खड्ड्यात ; प्रवास करताना नागरिकांचे होणारे हाल

लोणावळा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली अवस्था आणि त्यावरून प्रवास करताना नागरिकांचे होणारे हाल बघता या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकादेखील सतत लांबणीवर पडत असल्याने एरवी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर धावणारे राजकारणी या वेळी जनतेच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाही घरात बसून राहिलेले दिसत आहेत. त्यामुळे किमान निवडणूक लागेपर्यंत तरी या जनतेला कोणी वाली असणार आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जीव मुठीत घेऊन दुचाकीचालकांचा प्रवास
लोणावळा शहरात भांगरवाडी, बाजारपेठ, रायवूड परिसर, मावळा पुतळा चौक याठिकाणी रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा होऊन चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण तर होतो आहेच; पण सोबत त्यांच्या वाहनांचेदेखील नुकसान होते आहे.

भांगरवाडी विभागातील रस्त्यांची दुरवस्था
भांगरवाडी विभागात तर इंद्रायणी पूल ते कुसगाव हद्द या संपूर्ण रस्त्यावर असे एकही ठिकाण राहिलेलं नाही की ज्या भागात खड्डे नाहीत. या खड्ड्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर नागरिकांकडून वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत. नुकत्याच यशस्वीरित्या लाँच झालेल्या चांद्रयान 3 मधून टिपण्यात आलेली लोणावळ्यातील रस्त्यांची छायाचित्रे असे कॅप्शन देऊन या रस्त्यांवरील खड्डे सोशल मीडियावर दाखवले जात आहेत. तर, अनेकजण मागील 5 वर्षांत शहरातील रस्त्यांवर एकही खड्डा न बघितल्याचा दाखला देत त्या तुलनेत सध्या सुरू असलेल्या प्रशासकीय कालखंडात शहराची दुरवस्था दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याच्या खोदाईमुळे अडचणीत वाढ
एकीकडे रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना त्यात भरीस भर म्हणून दुसरीकडे रायवूड आणि वर्धमान सोसायटी परिसरात रस्त्याच्या बाजूला पावसाळी गटर बांधण्याचे सुरू असलले काम स्थानिक नागरिकांच्या सोबतच येथे येणारे पर्यटक आणि वाहतूक व्यवस्थापन करणार्‍या पोलिस प्रशासनाची परीक्षा घेत आहे. गटारीसाठी नाहक उकरून ठेवलेले रस्त्याचे साईडपट्टे, रस्त्यावर आलेली माती, त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, शिवाय लोकांच्या घराच्या गेटसमोरच खोदून ठेवलेले रस्ते त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे जर काम पूर्ण होणारच नव्हते, तर मग विनाकारण खोदाई करण्याची घाई प्रशासनाने आणि ठेकेदाराने का केली? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. सध्या लोणावळा परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत असून, त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा
लागत आहे.

हेही वाचा : 

Delhi Flood : दिल्लीत पुरानंतर रोगराई पसरण्याचा धोका, यमुना नदीची पाणी पातळी कमी झाली

कोल्हापूर : अभिनेते रवींद्र महाजनांच्या आठवणींना गडहिंग्लजकरांकडून उजाळा

 

Back to top button