कोल्हापूर : अभिनेते रवींद्र महाजनांच्या आठवणींना गडहिंग्लजकरांकडून उजाळा | पुढारी

कोल्हापूर : अभिनेते रवींद्र महाजनांच्या आठवणींना गडहिंग्लजकरांकडून उजाळा

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा; मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांनी पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने गडहिंग्लजच्या भागात वास्तव्य केले होते. त्यांचे गडहिंग्लजशी खास नाते होते. महाजनींच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

८० च्या दशकातील काळ रवींद्र महाजनी यांच्या ऐन तारुण्यातील काळ होता. त्यांच्या बहुतांशी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात झाले. १९७८-८० साली महाजनी यांनी ‘देवघर’ हा पहिला मराठी चित्रपट केला. या चित्रपटातील काही भागाचे गडहिंग्लज परिसरात चित्रीकरण झाले. कडगाव येथील वाड्यात बहुतांश भाग चित्रीत करण्यात आला. त्यावेळी निर्माते जगदीश खेबूडकर यांच्यासह अभिनेत्री रंजना देशमुख व सहकलाकारांसह गडहिंग्लज परिसरात हजेरी लावली होती.

त्यावेळी गडहिंग्लजचे नाट्यकर्मी कै. विश्वनाथ आलूरकर, कै. रावसाहेबअण्णा कित्तूरकर आदी मंडळींनी कलाकारांना मोलाचे सहकार्य केले. देवघर चित्रपटातील गडहिंग्लजच्या काही स्थानिक कलाकारांना आवर्जून संधी देण्यात आली होती. त्याकाळी चित्रपटसृष्टी अन् चित्रीकरण हा मोठा औत्सुक्याचा विषय होता.

महाजनी, रंजना यांच्यासोबत देवघर चित्रपटात अशोक सराफ, चंद्रकांत गोखले, वत्सला देशमुख, दत्ता खेबूडकर, पद्मा चव्हाण अशी मातब्बर मंडळी होती. त्यामुळे गडहिंग्लज परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी मजली होती. महाजनी, रंजना यांच्यासोबत सर्वच कलाकार गडहिंग्लजकरांच्या प्रेमाने भारावले होते. ग्रामीण भागातील लोकांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला होता. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर जुन्या जाणत्या नागरिकांनी आवर्जून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा : 

Back to top button