चक्क पीएमी अध्यक्षांनी हात दाखवूनही बस थांबवली नाही ! | पुढारी

चक्क पीएमी अध्यक्षांनी हात दाखवूनही बस थांबवली नाही !

पुणे : विश्रांतवाडी येथे एका बसथांब्यावर उभे राहून पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी एका बसला हात केला. मात्र, त्यांच्यासाठी देखील त्या बसचालकाने बस थांबवली नाही, यावरून प्रवाशांना कशी सेवा मिळत असेल, याचा प्रत्यक्ष अनुभव सिंह यांनी रविवारी घेतला.
प्रवाशांना शहरांमध्ये कशाप्रकारे बस सेवा पुरवली जात आहे, याची प्रत्यक्ष पाहणी पीएमपी अध्यक्षांनी रविवारी केली. त्यांनी विश्रांतवाडी ते पुणे स्टेशन आणि मनपा ते आळंदी या दोन मार्गांवर प्रवास केला. या वेळी त्यांनी रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पन्नास रुपयांचा पास काढून बस प्रवास केला. रिकामी असतानादेखील चालकाने थांब्यावर बस थांबवली नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव सिंह यांना आल्यामुळे संबंधित चालकावर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दर शनिवारी सर्व अधिकारी मार्गावर
पुणेकर प्रवाशांना पीएमपीकडील सेवा कशाप्रकारे मिळत आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती सिंह यांना रविवारी मिळाली. चालक आणि वाहक प्रवाशांना व्यवस्थितपणे सेवा देत नसल्याचे त्यांचा लक्षात आले आहे. पीएमपीतील अधिकारीदेखील याकडे लक्ष न देता शनिवार-रविवार नुसत्याच सुट्ट्या घेत आहेत. चालक-वाहकांवर लक्ष देण्यासाठी आणि चांगली सुविधा पुणेकर प्रवाशांना देण्यासाठी पीएमपी अध्यक्ष सिंह आता दर शनिवारी ताफ्यातील सर्व अधिकार्‍यांना मार्गावर उतरवणार आहेत.

प्रवासी पीएमपीसाठी दैवत आहेत, त्यांना चांगली सेवा मिळायला हवी. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. रविवारी प्रवासी सेवेची पाहणी केली. चालकांनी सर्व बसथांब्यांवर व्यवस्थित बस थांबवाव्यात. प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन करू नये; अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.
             – सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button