डोक्यावर मुसळधार, पण पाणीटंचाई फार ! पुण्यातील ‘या’ भागातील नागरिकांची भावना; काय आहे नेमंक प्रकरण ? | पुढारी

डोक्यावर मुसळधार, पण पाणीटंचाई फार ! पुण्यातील 'या' भागातील नागरिकांची भावना; काय आहे नेमंक प्रकरण ?

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गुजर-निंबाळकरवाडी येथील डीपीमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून बिघाड झाल्याने डबल फेज वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ‘डोक्यावर मुसळधार; पण पाणीटंचाई फार,’ अशी भावना व्यक्त करीत नागरिकांनी महावितरण कंपनीच्या ढिसाळ काराभाराविरोधात संताप व्यक्त केला. डीपीमध्ये बिघाड झाल्याने गुजर-निंबाळकरवाडीचा पाणीपुरवठा बंद असल्याने गेल्या पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे तक्रारही केली.

अधिकार्‍यांकडून दररोज वीजपुरवठा सुरळीत होण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी परिस्थिती अद्यापही ’जैसे थे’ आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गुजर-निंबाळकरवाडीच्या मूलभूत सुविधांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांना आता महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा शॉक बसत आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींमध्ये पाणी असूनसुद्धा विद्युत पंपाला वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने परिसरातील पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे माजी सरपंच दीपक गुजर यांनी सांगितले.

गेल्या पाच दिवसांपासून महावितरणने वीजपुरवठ्यातील दुरुस्ती न केल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पंप बंद आहे. यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

– व्यंकोजी खोपडे, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी

खलाटेनगर येथे डीपीमध्ये बिघाड होऊन केबल जाळली होती. त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे तसेच अन्य ठिकाणी वीजपुरवठ्यात बिघाड झाला असल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.

– संजय घोडके, उपअभियंता, महावितरण

हेही वाचा

पंढरीच्या वारीत पुण्यातील नांदेडकर दिंडी स्वच्छतेत दुसरी

नगर : मेजर बाबासाहेब चौधर शहीद ; निपाणी जळगावात शासकीय इतमामात अंत्यसंकार

Ashes 2023 : ‘बॅझबॉल’ची अग्निपरीक्षा! बेन स्टोक्सवर इंग्लंडच्या विजयाची मदार

Back to top button