पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आणखी २ पोलिस निरीक्षकांसह ७ जण निलंबित, ‘ते’ प्रकरण चांगलाच भोवले | पुढारी

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आणखी २ पोलिस निरीक्षकांसह ७ जण निलंबित, 'ते' प्रकरण चांगलाच भोवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तीन दिवसांत निलंबनाची दुसरी मोठी कारवाई केली आहे. वारजे पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके, गुन्हे निरीक्षक दत्तराम बागवे यांच्यासह तीन पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचारी अशा सात जणांना एकाच दिवशी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, यशवंत पडवळे, जर्नादन होळकर, कर्मचारी सचिन कुदळे, अमोल भिसे अशी अन्य निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वारजे परिसरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांनी धुडगूस घातला आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केलेला गोळीबार आणि त्यानंतर सराईत गन्हेगार पपुल्या वाघमारे व त्याच्या साथीदाराने वाहनांची तोडफोड करूत घातलेला राडा, हे दोन्ही प्रकार निलबंन करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना भोवल्याचे दिसून येते आहे. तोडफोडीच्या घटनांचे पडसात उमटल्यानंतर पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. तसेच गृह विभागाने देखील या सर्व घटनांचा सविस्तर अहवाल मागितला होता.

वाघमारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, या सर्वांनी मोक्का कारवाई करण्याबाबत कोणत्याही प्रकारची सकारात्मकता दाखविली नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत दिसून आले आहे. त्यामुळे जर वेळीच वाघमारेवर कारवाई करण्यात आली असती तर तोडफोडीची घटना टाळता आली असती. त्याचाच ठपका ठेवत सर्वांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक, गुन्हे निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचारी, अशा सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

हेही वाचा

सहकार पाठबळास मोदींचे नेतृत्व जगमान्य : बिपीनराव कोल्हे

नारायणगाव येथे फूडपार्कसाठी प्रयत्न करणार : अब्दुल सत्तार

पुणे : सहकाराला केंद्रातून बळ ! अधिकार्‍यांना हव्या त्या ठिकाणी बदल्या दिल्याची ओरड

Back to top button