पुणे : ईदच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल | पुढारी

पुणे : ईदच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ईदच्या पार्श्वभूमीवर गोळीबार मैदान चौक येथील ईदगाह येथे नमाज पठणाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 29) सकाळी सहा वाजता होणार आहे. त्या ठिकाणी नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, सेव्हन लव्हज चौक परिसरातील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

असा असेल वाहतूक बदल

सोलापूर रस्त्याने मम्मादेवी चौक येथून गोळीबार चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग- मम्मादेवी चौक बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे वाहन चालकांनी जावे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग- गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक, सेव्हन लव्हज चौकातून जावे.

सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग- सॅलिसबरी पार्क सीडीओ चौक भैरोबानाला येथून जातील. भैरोबानालाकडून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येणार आहे. ही वाहने एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे जातील. पर्यायी मार्ग- प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने डने किंवा भैरोबानाला वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळी जातील. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व जड मालवाहतूक वाहने, जड प्रवासी बस, प्रवासी एसटी बसेस, पीएमटी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.

मुस्लिम समाजबांधवांत उत्साह

मशिदीमध्ये ईदनिमित्ताने नमाज पठण, शिरखुर्म्याचा गोडवा अन् मुस्लिम समाजबांधवांत उत्साह…अशा पद्धतीने गुरुवारी (दि.29) शहरात बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सर्व मशिदींमध्ये सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत सामूहिक नमाज अदा करण्यात येणार आहे. ईदनिमित्त मुस्लीम समाजबांधवांमध्ये उत्साह असून, सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये, साफसफाईकडे लक्ष द्यावे, कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, तसेच कुटुंबासोबत नमाज अदा करावी, असे आवाहन सिरत कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख यांनी केले आहे.

बकरी ईद निमित्त संस्था-संघटनांच्या वतीने काही सामाजिक उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत. बकरी ईद आणि आषादी एकादशी शांततेने साजरी करण्यात यावी, सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये, कुर्बानीच्या ठिकाणी साफसफाईकडे लक्ष द्यावे, असे कमिटीतर्फे सांगण्यात आले.

याविषयी रफीउद्दीन शेख म्हणाले, ‘सर्व मशिदींमध्ये सकाळी साडेसहा ते दहा यावेळेत सामूहिक नमाज पठण होईल. त्यानंतर घरी खीर-शिरखुर्मा आणि बिर्याणी तयार केली जाणार आहे. 29 जून ते 1 जुलै या तीन दिवस कुर्बानी होईल. पण, सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये, असे आवाहन आम्ही केले आहे.’

सामूहिक नमाज उद्या
सकाळी नऊ वाजता दरवर्षी पुण्यातील ईदगाह गोळीबार मैदानावर सामूहिक नमाज अदा केली जाते. यंदा सामूहिक नमाज सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पुणे मार्केट यार्डच्या स्थलांतरासाठी आग्रही ; शरद पवार यांची ग्वाही

पुणे : रिंगरोडमधील बाधित गावांचे 20 जुलैपर्यंत फेरमूल्यांकन

Back to top button