पुणे मार्केट यार्डच्या स्थलांतरासाठी आग्रही ; शरद पवार यांची ग्वाही | पुढारी

पुणे मार्केट यार्डच्या स्थलांतरासाठी आग्रही ; शरद पवार यांची ग्वाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘पुण्यातील व्यापार वाढला असून, मार्केट यार्डची जागा अपुरी पडत आहे. त्याचे स्थलांतर करण्यासाठी पीएमआरडीएशी चर्चा केली आहे. नव्या जागेसाठी राज्य सरकारने योग्य भूमिका घेण्याबाबत मी आग्रह धरणार आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. दी पूना मर्चंट चेंबरचे मुखपत्र असलेल्या ’वाणिज्य विश्व’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. बीएमसीसीच्या दोन प्राध्यापक आणि आठ विद्यार्थ्यांना चेंबरच्या वतीने पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली.

या वेळी विठ्ठलशेठ मणियार, उद्योजक फत्तेचंद रांका, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सहसचिव ईश्वर नहार, ‘वाणिज्य विश्व’चे संपादक प्रवीण चोरबेले, सहसंपादक आशीष दुगड, बीएमसीसीचे प्राचार्य जगदीश लांजेकर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘धान्य व्यापार पूर्वी नाना पेठेत होता. त्याच्या स्थलांतराला खूप विरोध झाला. व्यापार्‍यांना राजी करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मार्केट यार्डचे स्थलांतर झाले. त्यामुळे व्यापार कैक पटींनी वाढला.

पुणे हे शिक्षणाबरोबरच उद्योग व व्यापाराचेही महत्त्वाचे केंद्र आहे.’ राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘ई-कॉमर्समुळे सध्या पारंपरिक व्यापारापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा बाजार समित्यांच्या भुसार विभागांमध्ये शेतकर्‍यांचा शेतमाल येतच नाही. व्यापार टिकविण्यासाठी तेथे एक टक्का सेसची अंमलबजावणी तसेच बाजार नियमन करू नये, अशी आमची मागणी आहे.’ पुरुषोत्तमी शर्मा, प्रदीप लोखंडे, डॉ. संजय कंदलगावकर यांना ‘वाणिज्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अ‍ॅड. सुभाष किवडे आणि दिलीप साळवेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

‘वाणिज्य विश्व’चे संपादक प्रवीण चोरबेले यांनी मासिकाच्या वाटचालीचा आढावा घेतला. विठ्ठलशेठ मणियार यांनी शिष्यवृत्ती सुरू करण्यामागचे प्रयोजन सांगितले. सचिव रायकुमार नहार यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर नहार यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ संदेशाद्वारे ’वाणिज्य विश्व’च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : 

यंदाही राबवणार सेतू अभ्यासक्रम ; 4 ते 26 जुलै दरम्यान होणार अंमलबजावणी

हल्ल्लेखोर प्रवृत्ती ठेचण्याची गरज ! तरुणीवरील वाढत्या हल्ल्यानंतर नागरिकांची भावना

Back to top button