पुणे : प्रवासी रुग्णांसाठी रेल्वे ‘धावणार’ ; अत्यवस्थ स्थितीतील रेल्वे प्रवासी रुग्णांवर मोफत उपचार | पुढारी

पुणे : प्रवासी रुग्णांसाठी रेल्वे 'धावणार' ; अत्यवस्थ स्थितीतील रेल्वे प्रवासी रुग्णांवर मोफत उपचार

प्रसाद जगताप : 

पुणे : रेल्वेतून पडला… रेल्वेत प्रवास करताना दुखापत झाली… अचानक ब्लड प्रेशर वाढले… फीट आली… हृदयविकार आला तर काळजी नसावी. कारण, पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी रुग्णांसाठी आता ’मेडिकल इमर्जन्सी रूम’ सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अत्यवस्थ स्थितीतील रेल्वे प्रवासी रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे 200 गाड्यांची ये-जा होत असते. त्याद्वारे लाखो प्रवाशांची वाहतूक होते. या वेळी गाडीत चढताना अपघात, दुखापती अथवा लांबचा प्रवास करताना प्रवाशांना अनेक आरोग्याच्या समस्या येतात. कधी-कधी या समस्या इतक्या आणीबाणीच्या स्थितीतील असतात, की त्यांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र, अशावेळी म्हणजेच गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाले नाही तर प्रवाशांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर ही मेडिकल इमर्जन्सी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मेडिकल इमर्जन्सी रुममध्ये कोणत्या सेवा असणार?

  • 1200 स्क्वेअर फुटांचे प्रशस्त रुग्णालय
  • इमर्जन्सी उपचार केले जाणार
  • पेशंट प्रवाशांची ने-आण करण्याची व्यवस्था
  • प्राथमिक उपचार मिळणार
  • 24 तास डॉक्टर उपलब्ध असणार
  • इमर्जन्सीअसल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करणार
  • दोन महिन्यांत सेवा सुरू

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना अत्यावश्यक स्थितीतील उपचार सुविधा उपलब्ध असावी, याकरिताचे आदेश केंद्र शासनाने नुकतेच जारी केले आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर ही ‘मेडिकल इमर्जन्सी रूम’ची व्यवस्था रेल्वेच्या पुणे विभागाकडून उपलब्ध करण्यात येत आहे. त्याकरिता आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया सुरू असून, ई- ऑक्शन झाल्यावर लगेचच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती सुरू होण्यासाठी महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय काळजी घ्यावी?

  • गाडीला गर्दी असेल तर दुसर्‍या गाडीत बसावे दरवाजात उभे राहून ढकलाढकली करू नये.
  • गाडी पूर्णपणे थांबल्यावरच गाडीत चढावे.
  • विनाकारण दरवाजात उभे राहू नये.
  • रेल्वेगाडी आल्यावर प्रवाशांनी सुरक्षित अंतर ठेवून उभे राहावे.
  • प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत असताना मोबाईलवर बोलू नये

हे ही वाचा : 

भाजपमध्ये सातारा जिल्हा जिंकण्याचा दम नाही : शशिकांत शिंदे

महामार्गावरील 24 तास गस्त बंद करू नका ; वाहनचालकांकडून मागणी

Back to top button